अभिनेता सनी देओलचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. सनी देओल पंजाबच्या गुरदासपूर मधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याच मतदारसंघातून काँग्रेसने सुनील जाखड यांना उमेदवारी दिली होती. जाखड यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता विनोद खन्ना यांनी गुरदासपूर येथून विजय मिळवला होता. 27 एप्रिल 2017 रोजी त्यांचं निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटीनिवडणुकीत जाखड यांनी विजय मिळवला होता. याच मतदारसंघातून 2014 च्या आधी विनोद खन्ना 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

यानंतर पुन्हा एकदा भाजपाने याच मतदारसंघातून एका अभिनेत्याला मैदानात उतरवले आहे. सनी देओल यांची सावत्र आई हेमा मालिनी यांनाही मथुरा येथून भाजपाने तिकीट दिलं आहे. धर्मेंद्रही त्यांच्या प्रचारासाठी पोहोचले आहेत.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल, संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यावेळी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी सनी देओल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भेटला होता. त्यानंतर त्याच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर आता सनी देओलने भाजपात प्रवेश केला आहे.