‘शिवसेना भवनातून बॉलिवूड कलाकारांना फोन केले जातात, प्रतिमा संवर्धनासाठी पैसे देऊन ट्विट करवून घेतात’

मुंबई : ऑनलाइन टीम – ठाकरे सरकारकडून राज्यातील कोरोनाची खरी परिस्थिती लपवण्यासाठी आणि आपली प्रतिमा संवर्धनासाठी बॉलिवूड कलाकारांना शिवसेना भवनातून फोन केले जातात. बॉलिवूड कलाकारांना पैसे देऊन त्यांच्याकडून ट्विट करवून घेतले जातात, असा गंभीर आरोप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.

अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी सहा कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. यावरुन निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्स सांभाळण्यासाठी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करणार आहे. याशिवाय ठाकरे सरकारने आपली प्रतिमा संवर्धनासाठी रेन ड्रॉप या एजन्सीला काम दिले आहे. रेन ड्रॉप एजन्सी च्या संपर्कात करीना कपूर, कतरिना, दिशा पटानी, फरहान खान यासारखे कलाकार आहेत. करिना किंवा कतरिना यांनी नुकतेच केलेले ट्विट पाहिलं असेल. या कलाकारांना पैसे देऊन ट्विट करायला सांगितले जाते, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

सर्वांना उघडे पाडणार

आगामी अधिवेशनामध्ये आपण पुराव्यानिशी सर्वांना उघडे पाडणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. कोणाला किती पैसे दिले, किती बिलं आली आहेत, या सर्वाची माहिती माझ्याकडे आहे. लहान कलाकारांना ट्विट करण्यासाठी तीन लाख तर बड्या कलाकारांना त्याहून अधिक रक्कम दिली जाते. यासाठी शिवसेना भवनातून या कलाकांना फोन करुन थेट संपर्क साधला जातो, असा आरोप त्यांनी केला आहे.

तर लॉकाडाऊन वाढवला नसता

यावेळी बोलताना त्यांनी मुंबई मॉडेलवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ठाकरे सरकारने मुंबई मॉडेलचा गाजावाजा केला. हे मॉडेल एवढे यशस्वी झाले तर मग लॉकडाऊन 31 मे पर्यंत कशाला वाढवला, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. ठाकरे सरकार कोरोनाचे खरे आकडे लपवत आहे, त्यांना राज्यातील स्थिती गंभीर असल्याचे माहित आहे. राज्यात बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची माहिती सरकारला आहे, म्हणूनच सरकारने लॉकडाऊन हटवण्याची हिंमत दाखवली नाही.

‘मुंबई पॅटर्न’ फसवा

जर मुंबई पॅटर्न यशस्वी झाला असेल आणि मुंबईतील रुग्णसंख्या घटली असेल तर मुंबईत अनलॉक झालेच पाहिजे. दुकाने आणि इतर व्यवहार सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली पाहिजे. लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. मग उरलेल्या पंधरा दिवसात लोकांना पैसे कमवू द्यायचे होते. मुळात हे मुंबई मॉडेलच फसवे असल्याने सरकारने लॉकडाऊन वाढवले, असा आरोप नितेश राणे यांनी केला.