अभिनेत्री तापसी पन्नूला तब्बल 36 हजारांचे वीजबील, ट्विट करत व्यक्त केला संताप

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले असताना अवाच्या सवा दराने वीजबिल येत असल्याने महावितरणविरोधात राज्यभरात संताप आहे. वाढीव वीजबिलाचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रेटींनाही बसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री तापसू पन्नूला तब्बल 36 हजारांची वीजबिल आले आहे. ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती तिने दिली असून संताप व्यक्त केला आहे.

तापसी पन्नूने ट्विट करत म्हटले आहे की, लॉकडाउनचे तीन महिने आणि कोणती नवी उपकरणे मी वापरली आहेत किंवा नव्याने विकत आणली आहेत ज्यामुळे मला इतके वीजबिल आले आहे. कोणत्या वीजेचे शुल्क आकारत आहात ?, अशी संतप्त विचारणा तापसीने ट्विटच्या माध्यमातून केली आहे. यावेळी तापसीने अदानी वीज कंपनीला टॅगही केले आहे.

तापसीने आपल्या ट्विटमध्ये आधीच्या महिन्यांच्या वीजबिलाचे फोटोही जोडले आहेत. एप्रिल महिन्यात तापसीला 4 हजार 390 तर मे महिन्यात 3 हजार 850 रुपये बिल आले होते. इतकंच नाही तर तापसीने राहत नसलेल्या घरासाठीही भरमसाट वीजबिल आल्याचे सांगितले आहे. फक्त स्वच्छतेसाठी आठवड्यातून एकदा तिथे जात असल्याचे तिने म्हटले आहे. तापसीने यावेळी वीजबिलावर प्रश्चचिन्ह उपस्थित करताना कोणी माझ्या नकळत घराचा वापर करतेय का याची चिंता असल्याचे म्हटले आहे. अदानी कंपनीच्या प्रवक्त्याने मात्र, तापसीला पाठवलेले वीजदेयक वापरानुसार योग्यच आहे, असे स्पष्ट केले आहे.