CAA बद्दल ‘सिंगर’ अदनान सामी म्हणाला – ‘मुस्लिम म्हणून भारतात सुरक्षित वाटतं’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  इंडिया फाऊंडेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या आयडियाज कॉन्क्लेव या कार्यक्रमात सिंगर अदनान सामीनं नागरिकत्व कायद्यावर भाष्य केलं आहे. अदनान सामी म्हणाला, “एक मुस्लिम म्हणून मला भारतात सुरक्षित वाटतं.” आमिर खानच्या एका जुन्या वक्तव्यावरून सामीला प्रश्न विचारण्यात आले होते. आमिरनं सांगितलं होतं की, त्याच्या पत्नीनं त्याला सांगितलं की, भारतात तिला सुरक्षित वाटत नाही. मुलांना घेऊन तिला भारताच्या बाहेर जायचं आहे. आमिरच्या या वक्तव्यानं त्याला खूप नुकसान सहन करावं लागलं होतं हेही खरं आहे.

आमिर खानच्या या वक्तव्यानंतर अनेक कंपन्यांनी त्याच्यासोबत ब्रँडिंग करण्यासाठीचे करार मोडले होते. याच पार्श्वभूमीवर अदनान सामीला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानं त्याला कोणतीही अडचण नसल्याचं सांगत भारतात त्याला एकदम सुरक्षित वाटत आहे असंही त्यानं सांगितलं आहे.

सध्या नागरिकत्व कायद्यावरून देशात खूप गोंधळ सुरू आहे. अनेक ठिकाणी हिंसाचार झाला आहे. धर्माच्या आधारावर भेदभाव केल्याचा आरोप करत या कायद्याला जोरदार विरोध होताना दिसत आहे.

अदनान सामी आधी पाकिस्तानचा नागरिक होता. 2016 मध्ये तो भारताचा नागरिक झाला. 2001 पासून तो भारतात रहात होता. याआधीही सामीनं काँग्रेस सरकारच्या काळात भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. परंतु तेव्हा त्याला नागरिकत्व मिळाले नव्हते. परंतु मोदी सरकारच्या काळात त्याला नागरिकत्व मिळालं आहे.

You might also like