‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध ‘गीतकार’ योगेश यांचं निधन ! आनंदसहित ‘या’ सुपरहिट सिनेमांसाठी लिहिलीत गाणी

पोलीसनामा ऑनलाइन  – बॉलिवूडमध्ये एकाहून एक गाणी देणाऱ्या योगेश गौर यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की, 16 वर्षांच्या वयात लखनऊवरून मुंबईला आलेल्या योगेश यांनी एका सिनेमासाठी गाणी लिहिली. ऋषीकेश मुखर्जी यांनी ही गाणी ऐकली आणि आनंद सिनेमात त्यांना संधी दिली. कही दूर जब दिन ढल जाए आणि जिंदगी कैसी है पहेली हाय ही गाणी योगेश यांनी लिहिली आहेत.

मिली सिनेमातील आए तुम याद मुझे, छोटी सी बात सिनेमातील न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ आणि रजनीगंधा सिनेमातील कई बार यूं भी देखा है याशिवाय रिमझिम गिरे सावन सुलग जाए मन, न बोले तुम न मैने कुछ कहा, बडी सूनी सूनी है, जिंदगी ये जिंदगी अशी 70 च्या दशकातील अनेक सुपरडुपर हिट गाणी योगेश यांनी लिहिली आहेत.

दिग्गज गायिका लता मंगेशकर यांनी योगेश यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. ट्विट करत त्यांनी म्हटलं की, “मला आताच असं कळलं की हृदयाला स्पर्श करणारी गाणी लिहिणारे कवी योगेशजी यांना स्वर्गवास झाला आहे. हे ऐकून मला खूप दु:ख झालं. योगेशजींनी लिहिलेली अनेक गाणी मी गायली आहेत. योगेश खूप शांत आणि मधुर स्वभावाचे होते. मी त्यांना विनम्र श्रद्दांजली अर्पण करते.”