Thavasi Death : व्हायरल व्हिडिओत आर्थिक मदत मागणाऱ्या प्रसिद्ध तमिळ अभिनेत्याचं कर्करोगामुळं निधन ! रजनीकांत सोबत केलं होतं काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साऊथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते थवासी (Thavasi) मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. परंतु आता ते कर्करोगाशी आणि आयुष्याशी सुरू असलेली लढाई हरले आहेत. सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) थवासी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 60 वर्षीय थवासी मदुराईमधील एका रुग्णालयात भरती होते.

गेल्या आठवड्यात त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांना उपचारासाठी पैशांची खूप गरज होती. फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं होतं.

फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर त्यांना या महिन्याच्या सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांच्या जाण्यानं तमिळ फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सेलेब्सनं त्यांच्या मदतीसाठी पुढं आले होते.

थवासी हे साऊथ सिनेमातील प्रसिद्ध कलाकार होते. ते आपल्या पिळदार शरीरयष्टीसाठी खूप फेमस होते. परंतु आता कर्करोगामुळं त्यांची अवस्था खूपच वाईट झाली होती. व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संपर्क साधताना ते म्हणाले होते की, मी गेली अनेक वर्षे कर्करोगाशी लढत आहे. माझी सर्व संपत्ती मी उपचारासाठी खर्च केली आहे. आजारी असल्यानं गेल्या काही वर्षांत मी कामही केलेलं नाही. त्यामुळं मी आता आर्थिक संकटात सापडलो आहे. कृपया कोणी तरी मला मदतीचा हात द्यावा. मी आजन्म तुमचा ऋणी राहीन, अशी विनंती त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केली होती.

थवासी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर कीजहक्कु चीमाईले, अन्नथा अशा अनेक सिनेमात त्यांनी काम केलं आहे.

You might also like