2020 मध्ये बॉलिवूडला आणखी एक धक्का ! प्रसिद्ध ‘फिल्ममेकर’ हरीश शाह यांचं कॅन्सरमुळं मुंबईत निधन !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खानच्या निधनाच्या धक्क्यातून बॉलिवूड आणि प्रेक्षक अजून सावरलेही नाहीत तेच एका दिग्गज फिल्ममेकरचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक हरीश शाह यांनी जगाचा निरोप घेतला आहे. 76 वर्षीय शाह यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी (मंगळवार दि 7 जुलै 2020) शाह यांचं निधन झालं आहे. रिपोर्टनुसार गेल्या 10 वर्षांपासून ते घशाच्या कॅन्सरनं ग्रस्त होते. त्यांच्या अचानक जाण्यानं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

हरीश यांचे भाऊ विनोद म्हणाले…

एका इंग्रजी वृत्तानुसार, हरीश शाह यांचे भाऊ विनोद शाह यांनी सांगितलं की, “सकाळी 6 वाजता हरीश यांचं निधन झालं.” हरीश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दुपारीच पार पडले. कोरोनामुळं खूप कमी लोकांची उपस्थिती होती.

1972 साली करिअरला सुरुवात

हरीश यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1972 साली आलेल्या राजेश खन्ना आणि तनुजा यांचा सिनेमा मेरे जीवनसाथी मधून केली होती. यानंतर 1975 साली त्यांनी फिरोज खान आणि परवीन बाबी यांना घेऊन काला सोना या सिनेमाची निर्मिती केली होती. 1985 साली त्यांनी राम तेरे कितने नाम हा सिनेमा तयार केला. यात संजीव कुमार आणि रेखा प्रमुख भूमिकेत होते.

80 च्या दशकात दिग्दर्शनात नशीब आजमावलं

हरीश शाह यांनी 80 च्या दशकात दिग्दर्शनात नशीब आजमावलं. ऋषी कपूर आणि नीतू कपूरचा सिनेमा धन दौलत मधून त्यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली होती. यानंतर 1988 मध्ये त्यांनी धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांना घेऊन जलजला हा सिनेमा डायरेक्ट केला. 1995 मध्ये रेखा आणि मिथुन चक्रवर्ती यांचा अब इंसाफ होगा हा सिनेमा डायरेक्ट केला. 2003 साली आलेला सनी देओल आणि तब्बू स्टारर जाल – द ट्रॅप हा त्यांचा अखेरचा सिनेमा होता ज्याच्या निर्मितीत त्यांचा सहभाग होता.

कॅन्सरवर बनवला होता सिनेमा

एका रिपोर्टनुसार शाह यांनी कॅन्सरवरील एका सिनेमाची निर्मिती केली होती. Why Me असं या सिनेमाचं नाव होतं. खास बात अशी की, या सिनेमाला प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाला होता.