Birthday SPL : कधी बस कंडक्टकर, तर कधी कुली म्हणून केलं काम ! ‘असं’ बदललं ‘सुपरस्टार’ रजनीकांतचं नशीब

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड पासून तर हॉलिवूड पर्यंत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा आज (शनिवार, दि 12 डिसेंबर) 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरूमध्ये झाला होता. त्यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. आज एवढी लक्झरी लाईफ जगणारे रजनीकांत कधी बस कंडक्टर म्हणून काम करत होते. आज आपण त्यांच्या बद्दल काही न ऐकलेली माहिती जाणून घेणार आहोत.

रजनीकांत यांचा जन्म एका गरिब कुटुंबात झाला आहे. त्यांच्या वडिलांचं नाव रामोजीराव गायकवाड होतं. ते हवालदार होते. चार भावंडांमध्ये रजनीकांत सर्वात लहान होते. आई जिजाबाई यांचं निधन झालं आणि यानंतर सर्व कुटुंब पांगलं. घरची आर्थिक स्थिती खालवली. त्यांनी कुलीचं काम सुरू केलं. पैसे कमावण्यासाठी ते सुतार म्हणून काम करू लागले. खूप काळानंतर ते बंगळुरू परिवहन सेवा (BTS) मध्ये कंडक्टर बनले.

त्यांना अॅक्टर होण्याची खूप इच्छा होती. त्यामुळं त्यांनी 1973 मध्ये मंद्रास फिल्म संस्थेत प्रवेश घेतला आणि अभिनयात डिप्लोमा केला. कन्नड नाटकातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. महाभारतमधील त्यांनी साकारलेल्या दुर्योधनाच्या भूमिकेचं खूप कौतक झालं होतं. त्यांनी तमिळ सिनेमात एन्ट्री घेण्याआधी त्या भाषेचं शिक्षण घेतलं. अपूर्वा रागनगाल हा त्यांचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात कमल हासन हेही दिसले होते.

साऊथ सिनेमात नाव कमावल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्येही अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

रजनीकांत यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर साऊथसोबतच बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. अंधा कानून हा त्यांचा बॉलिवूडमधील पहिला सिनेमा होता. पहिल्या सिनेमात त्यांनी असं काम केलं की, बिग बी आणि हेमा मालिनी अशा स्टार्सलाही ते सरस वाटू लागले. चालबाज हा त्यांचा बॉलिवूडमधील दुसरा हिट सिनेमा होता. यानंतर त्यांनी जे काही सिनेम केले त्यानंतर ते मोठे स्टार म्हणून उदयास आले. त्यांनी रोबोट, 2.0, बाबा, बुलंदी, आगाज, क्रांतिकारी, आतंक ही आतंक, इंसानियत के देवता, त्यागी, दलपति, फूल बने अंगारे, हम, खून का कर्ज, फरिश्ते, मेरी अदालत, जॉन जॉनी जनार्दन, भगवान दादा, दोस्ती दुश्मनी, इंसाफ कौन करेगा, असली नकली असे अनेक सिनेमे करत लोकांचं मन जिंकलं.