‘इंडियन 2’ च्या सेटवरील दुर्घटनेतील मृतांना 1-1 कोटींची मदत जाहीर, डायरेक्टरनं व्यक्त केलं दु:ख

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता कमिल हासन यांच्या इंडियन 2 सिनेमाच्या सेटवर अलीकडेच एक दुर्घटना घडली होती ज्यामुळं सर्वांनाच धक्का बसला होता. या दुर्घटनेत 3 लोकांचा मृत्यू झाला. बाकी लोकही अद्याप या धक्क्यातून सावरले नाहीत. सिनेमाचे डायरेक्टर एस शंकर यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी मोठी घोषणा केली आहे.

इ़ंडियन 2 सिनेमाचे डायरेक्टर शंकर यांनी मृतांच्या कुटुंबियांना एकूण 3 कोटी रुपये देण्याची घोषणा करत त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. एका इंग्रजी वृत्तानं दिलेल्या माहितीनुसार, शंकर म्हणाले, “या सिनेमाच्या शुटींगदरम्यान जीव गमावणाऱ्या लोकांच्या कुटुंबियांना एक एक कोटी रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाणार आहेत. मृत कृष्णा, मधु आणि चंद्रन यांच्या कुटुंबियांना कोणतीही मदत दिली तरीही त्यांची कमी भरून निघणार नाही. तरीही मी पीडितांच्या कुटुंबाला 1 कोटींची मदत देत आहे जी त्यांच्यासाठी लहान आहे.”

शंकर यांनी असंही म्हटलं की, अद्याप तेदेखील या घटनेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रकारची सुरक्षा करण्यात आली असूनही ही दुर्घटना घडली यावर कोणाला विश्वास बसत नाही.

साऊथ सुपरस्टार कमल हासनच्या इंडियन 2 या सिनेमाच्या सेटवर बुधवारी(दि 19 फेब्रुवारी) एक दुर्घटना घडली. चेन्नईच्या ईव्हीपी स्टुडिओच्या सेटवर एक क्रेन क्रॅश झाली. या घटनेत सिनेमाच्या असिस्टंट डायरेक्टरसहित तीन लोकांचा मृत्यू झाला. या अपघातात 10 लोक जखमी झाले होते. या घटनेच्या एका प्रत्यक्षिदर्शीनं याबाबत माहिती दिली होती. सिनेमाची कॉस्ट्युम डिझायनर अमृता राम हिच्यानुसार, सिनेमाचे हिरो कमल हासन आणि अ‍ॅक्ट्रेस काजल अग्रावाल हेही या क्रेन पासून फार थोड्या अंतरावर होते. या घटनेतून ते थोडक्यात बाचावले आहेत.