तैमूरला भाऊ झाला, करिना-सैफला पुत्ररत्न

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : करीना कपूर खान पुन्हा एकदा आई बनली आहे. यावेळी तिने बेबी बॉयला जन्म दिला आहे. काल रात्री करीना कपूर खानला ब्रिज कँडी रुग्णालयात (मुंबई) दाखल करण्यात आले. सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी ऑगस्ट 2020 मध्ये जाहीर केले की त्यांना दुसऱ्या मुलाची अपेक्षा आहे. करीना कपूरच्या डिलिव्हरीची तारीख 15 फेब्रुवारी असल्याचे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत अभिनेत्रीचे चाहते गेल्या काही दिवसांपासून या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते.

2016 मध्ये करीना कपूर खानने तिचा पहिला मुलगा तैमूर अली खानला जन्म दिला होता, त्यानंतर आता तिला दुसरे मूल झाले आहे, यासह सैफ अली खान चौथ्यांदा बाप बनणार आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भैयानी यांच्या पोस्टनुसार करिना कपूरने सकाळी 4:45 वाजता तिच्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला. दरम्यान, कपूर कुटुंबाच्या वतीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. कपूर कुटुंबातील करीना-सैफच्या दुसर्‍या मुलाच्या अधिकृत घोषणेची चाहत्यांनाही प्रतीक्षा आहे.

दरम्यान, दुसर्‍या मुलाच्या जन्मापूर्वीच सैफ अली खान आणि करीना कपूर एका मोठ्या घरात शिफ्ट झाले आहेत. या घरात एक खास नर्सरीही तयार केली गेली आहे, जिथे तैमूर आपल्या धाकट्या भावासोबत वेळ घालवू शकेल. यासह, दोघांनीही तैमूर अली खानला नवीन पाहुण्यासाठी तयार करणे सुुुुरू केले आहे. गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांतही करीना सतत काम करत होती. मुलाच्या जन्मानंतर त्याला पूर्ण वेळ देण्यासाठी, करिनाने आधीपासूनच बॅक-टू-बॅक शूट करून तिचे सर्व काम पूर्ण केले आहे.