ICU मध्ये व्हेंटिलेटरवर ‘भारतरत्न’ लता मंगेशकर, प्रकृती अद्यापही ‘चिंताजनक’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना प्रकृती अस्वास्थाच्या कारणावरून मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. फुप्फुसांमध्ये झालेल्या इन्फेक्शनमुळे त्यांना उपचारासाठी भरती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. टाइम्‍स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 90 वर्षीय लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना रात्री दीड वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आता त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

इंटरनल मेडिसिन फिजिशन, डॉक्‍टर प्रतित समदानी यांनी आपल्या अहवालात सांगितले आहे कि, लता मंगेशकर यांना निमोनिया झाला असून त्यांचा डावा वेंट्रिकुलर देखील खराब झाला आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून मागील काही तासांमध्ये यामध्ये सुधारणा पाहायला मिळाली. त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालय आणखी माहिती देत नसून त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

दरम्यान, लता मंगेशकर या भारतातील सर्वात प्रसिद्ध गायिका असून त्यांनी आतापर्यंत 36 भाषांमध्ये गाणे गायले आहे. तसेच 1 हजारहुन अधिक गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला असून त्यांना 2001 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले होते.

Visit : Policenama.com