चेन्नईमध्ये होणार्‍या पहिल्या ‘ट्रान्सजेंडर’च्या बिल्डींगसाठी ‘खिलाडी’ अक्षयनं केली 1.5 कोटींची मदत

पोलीसनामा ऑनलाइन- बॉलिवूड स्टार अक्षय कुमार लक्ष्मी बॉम्ब सिनेमात काम करताना दिसणार आहे. लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे. परंतु त्याआधीच अक्षय चर्चेत आला आहे. लक्ष्मी बॉम्ब सिनेमाचे डायरेक्टर राघव लॉरेंस आणि अक्षय कुमार चेन्नईमध्ये ट्रान्सजेंडरसाठी घर बनवणार आहेत. खुद्द राघवनं सोशलवरून याबाबत माहिती दिली आहे.

राघवनं पोस्ट शेअर करत ट्रान्सजेंडरला आश्रय प्रदान करणाऱ्या या पोस्टबद्दल सविस्तर सांगितलं आहे. सोबत 1.5 कोटी या कामासाठी दान केल्याबद्दल त्यानं अक्षय कुमारचे आभारही मानले आहेत.

राघव आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “मी चांगली बातमी शेअर करत आहे. अक्षय सर पहिल्यांदाच ट्रान्सजेंडरांसाठी घर बनवण्यासाठी 1.5 कोटी रुपये दान देत आहेत. ट्रान्सजेंडरांच्या प्रगतीसाठी एक नवीन सुरुवात करत आहोत. आम्हाला त्यांना निवारा द्यायचा आहे. आमच्या ट्रस्टनंही भूमी दान केली आहे. आम्ही धन एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.” राघव लॉरेंसनं चॅरिटेबल ट्रस्ट शिक्षण, मुलांसाठी घर, चिकित्सा आणि शारीरिकदृष्ट्या अपंग डान्सर्ससाठी विविध प्रोजेक्ट सुरू केले आहेत.

राघव पुढे म्हणतो, “लक्ष्मी बॉम्बच्या शुटींगदरम्यान मी जेव्हा अक्षय सरांना ट्रान्सजेंडरांना घर देण्याच्या प्रोजेक्टबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी कोणताही प्रश्न न विचारता लगेच यासाठी होकार दिला. त्यांच्या(ट्रान्सजेंडर) घराच्या निर्मितीसाठी अक्षय सर 1.5 कोटी दान करत आहेत. जो कोणी मदत करत आहे त्याला मी देवाप्रमाणे मानतो. अक्षय सर आमच्यासाठी देवच आहेत. या प्रोजेक्टसाठी त्यांनी दिलेल्या या विशाल समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानतो. आमचं ध्येय पूर्ण भारतात ट्रान्सजेंडरांना घर देण्याचं आहे.”

राघव म्हणतो, “मी सर्व ट्रान्सजेंडरांच्या वतीनं अक्षय सरांना धन्यवाद देतो. आम्ही लवकरच पूजेची तारीखही सांगू. मला तुमच्यासोबत सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे.”