डॉ. श्रीराम लागू यांच्या नावानं महाराष्ट्र सरकार देणार ‘पुरस्कार’, जाणून घ्या कोणत्या नावानं ओळखला जाणार ‘अवॉर्ड’

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने एका नव्या पुरस्काराची घोषणा केली आहे. हा पुरस्कार द नटसम्राट श्रीराम लागू या नावाने ओळखला जाणार आहे. हा पुरस्कार मराठी चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट काम करणार्‍यांना दिला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ही माहिती दिली आहे.

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वयाच्या 92 वर्षी निधन झाले होते. हिंदी आणि मराठी सिनेमामध्ये डॉ. लागू यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपटांमधून काम केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा डॉ. लागू यांच्या निधनावर त्यावेळी दु:ख व्यक्त केले होते. पीएमने लिहिले होते, डॉ. श्रीराम लागू यांच्या व्यक्तीमत्वात विविधता आणि ज्ञान दिसून येत होते. आपल्या अनेक वर्षांच्या प्रवासात त्यांनी अतिशय उत्तम आणि कसदार अभिनयाने लोकांना आश्चर्यचकीत केले होते. त्यांचे काम येत्या अनेक वर्षात लक्षात ठेवले जाईल.

डॉ. श्रीराम लागू एक उत्कृष्ट अभिनेते होते, शिवाय एक चांगले ईएनटी सर्जन सुद्धा होते. त्यांनी आपल्या करियरमध्ये चित्रपटांसह 20 मराठी नाटकांचे दिग्दर्शनसुद्धा केले होते. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात डॉ. लागू चित्रपटांमध्ये एक प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखले जात होते. यारदम्यान त्यांनी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत सुमारे 60 चित्रपटात विविध भूमिका साकारल्या. 1990 नंतर पडद्यावरील त्यांची उपस्थितीत कमी होत गेली, परंतु नाटकांमधून ते दिसत होते.

डॉ. लागू प्रसिद्ध नाटक नटसम्राटचे पहिले हिरो होते. हे नाटक प्रसिद्ध लेखक कुसुमाग्रज यांनी लिहिले होते. या नाटकांतील त्यांच्या अभिनयाचे स्मरण आजही केले जाते. नटसम्राट नाटकात त्यांनी अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका केली होती, ज्यास नाट्यसृष्टीत मैलाचा दगड मानले जाते. या नाटकातील त्यांच्या कसदार भूमिकेमुळे ते नटसम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले. अभिनेता नसरुद्दीन शाह यांनी एकदा म्हटले होते की, श्रीराम लागू यांचे आत्मकथन लमाण कोणत्याही अ‍ॅक्टरसाठी बायबलप्रमाणे आहे. यासाठी पुरस्काराचे नाव नटसम्राट ठेवण्यात आले आहे.