‘कालापानी-लिपुलेख’ नेपाळच्या नकाशात दाखवल्याचं अभिनेत्री मनीषा कोईरालानं केलं समर्थन ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  भारत आणि नेपाळ यांच्यात लिपुलेख आणि कालापानी या भागांवरून जो वाद सुरू आहे तो काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. नेपाळनं अलीकडेच एक नवीन नकाशा जारी करत लिपुलेख आणि कालापाणी हा भाग त्यांचा आहे असा दावा केला आहे. हा वाद नोव्हेंबर 2019 मध्ये तेव्हा वाढला जेव्हा भारताच्या गृहमंत्रालयानं जारी केलेल्या नकाशात कालापानी भागाचा समावेश होता. नेपाळची रहिवासी बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस मनीषा कोईराला हिनं यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

नेपाळी वंशाची मनीषा करोईराला हिनं नेपाळ सरकारनं घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. मनीषानं नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या त्या ट्विटचं समर्थन केलं ज्यात त्यांनी कालापानी आणि लिपुलेख सारखा वादग्रस्त भाग नेपाळच्या नकाशात समाविष्ट केला होता. ती ट्विट करत म्हणाली की, आपल्या छोट्याशा देशाची प्रतिष्ठा राखण्यासाठी धन्यवाद. मी सर्वच तीनही महान देशांमध्ये शांततापूर्ण आणि आदरयुक्त बातचित व्हावी अशी इच्छा व्यक्त करते.”

याआधी नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावली यांनी ट्विट केलं होतं की, “मंत्रिपरिषदेनं आपले 7 प्रांत, 77 जिल्हे आणि 753 स्थानिक प्रशासनीय विभाग पाहता देशाचा नवीन नकाशा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यात लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापनी यांचा समावेश आहे.” प्रदीप यांनी असंही सांगितलं की, देशाचे भू व्यवस्थापन मंत्रालय लवकरच अधिकृत नकाशा प्रसिद्ध करेल.

कालापनी आणि लिपुलेखवर नेपाळ त्यांचा दावा करत आहे. 8 मे रोजी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कैलास मानसरोवरला जाण्यासाठी 80 किमी लांब रस्त्यांचं उद्घाटन केलं होतं. पिथोरागढ-धारचूला पासून लिपुलेखला जोडणाऱ्या या रस्त्याचं व्हिडीओ कॉन्फरंसिंगनं उद्घाटन करण्यात आलं होतं. हा रस्ता लिपुलेख पासवर संपतो. याबद्दल नेपाळनं नाराजी जाहीर केली होती. नेपाळनं याचा विरोध करत म्हटलं होतं की असं करणं दोन्ही देशातील समजुतीच्या विरोधात आहे. मनीषाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून ती सिनेमात अ‍ॅक्टीव दिसत आहे. राजकुमार हिरानीचा ब्लॉकबस्टर सिनेमा संजूमध्ये तिनं रणबीर कपूरच्या आईची भूमिका साकारली होती.