अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’च्या प्रदर्शनाचा मार्ग ‘मोकळा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या छपाक सिनेमावरील स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे आता छपाक सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्य घटनेवर आधारीत कथेवर कॉपीराईट कसा होऊ शकतो असा सवाल मुंबई हायकोर्टाने केला होता. यानंतर याचिकाकर्त्यांनी स्थगितीची मागणी मागे घेतली आहे.

लवकरच दीपिका पादुकोणचा छपाक सिनेमा रिलीज होणार आहे. परंतु कथा चोरल्याचा आरोप करत सिनेमाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. आज (बुधवार दि 8 जानेवारी) या याचिकेवर सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाने सवाल केला की, “सत्य घटनेवर आधारीत सिनेमाच्या कथेवर कॉपीराईट कसा होऊ शकतो?” यानंतर याचिकाकर्त्यांनी स्थगितीची मागणी मागे घेतली. परंतु कथेतील इतर घटनांशी साधर्म्य आढळून आल्यास मात्र याचिकाकर्त्यांसाठी कोर्टात दाद मागण्याचा पर्याय कोर्टाने खुला ठेवला आहे. राकेश भारती असं याचिकाकर्त्यांचं नाव आहे. दीपिका पादुकोणचा छपाक हा सिनेमा 10 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे.

छपाकच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी विनंती केली होती की, सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावण्यात यावी. प्रसिद्धी मिळवण्यासाठीच आणि सिनेमाच्या प्रदर्शनात अडथळा निर्माण करण्यासाठी किंवा त्यात विलंब करण्याच्या हेतूने ही याचिका दाखल करण्यात आली असा दावा त्यांनी केला होता. मंगळवारी त्यांनी मुंबई हाय कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. कायद्यानुसार सत्य घटनेवर आधारीत सिनेमाच्या कथेवर कॉपीराईटचा दावा केला जाऊ शकत नाही असंही त्या म्हणाल्या होत्या.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/