राज ठाकरे माझा आवडता ब्रँण्ड, ‘या’ दिग्दर्शकाने शेअर केला फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात वाद सुरु असून भाजपने शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यात ‘ठाकरे ब्रँड’ रुजला पाहिजे असे म्हणत राज ठाकरे यांना भावनिक साद घातली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात ‘ठाकरे ब्रँड’ची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याच संदर्भात मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

ठाकरे हा महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा ब्रॅण्ड आहे. राज ठाकरे हे सुद्धा या ब्रॅण्डचे एक घटक आहेत व मुंबई वरुन सध्या सुरु असलेल्या राजकारणाचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे ब्रँड’चा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे ब्रँड’चे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असं संजय राऊत यांनी सामनातील लेखातून राज ठाकरे यांना साद घातली होती. त्यानंतर राऊत यांच्या या लेखावर मनसेकडून प्रतिक्रिया येत आहेत. केदार शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना खास फोटोही शेअर केला आहे.

केदार शिंदे यांनी राज ठाकरे सोबतचे दोन फोटो शेअर केलेत. एक जूना फोटो आणि तर एक नवीन फोटो आहे. या फोटोंना त्यांनी दिलेलं कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या ‘ब्रँण्ड’च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा फोटो मिळवण्याची धडपड होती… कधी मांडीला मांडी लावून बसेन, मैत्री होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं केदार शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांच्या फोटोचे कॅप्शन चर्चेचा विषय ठरत आहे.

यापूर्वी देखील केदार शिंदे यांनी ते राज ठाकरे यांचे मोठे चाहते असल्याचे अनेकवेळा सांगितले आहे. काही महिन्यापूर्वी त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबतचा एक जूना फोटो शेअर करत त्या फोटोच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या. राज ठाकरे यांच्याविषयी पहिल्या पासूनच कुतूहल. आपलाही त्यांच्या सोबत फोटो असावा हा विचार 1995 साली होता. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, त्यांच्यासोबत इतक्या जवळचे संबंध 2002 पासून निर्माण होतील. यानंतर त्यांच्या सोबतचे असंख्य फोटो आहेत. अगदी खांद्याला खांदा लावून ते खांद्यावर हात टाकून, पण पहिल्या फोटोची मजाच और ! फॅन असल्याची चमक माझ्या डोळ्यात दिसत आहे, असे कॅप्शन शिंदे यांनी दिले होते.