ऋषी कपूर, इरफान खान यांच्या निधनावर मार्कंडेय काटजूचं ‘खोचक’ ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेते इरफान खान यांचे बुधवारी झालेल्या अकस्मात निधनाच्या शोकातून मनोरंजन नगरी अद्याप बाहेर पडली नव्हती तोच ज्येष्ठ अभिनेते आणि सदाबहार कलावंत ऋषी कपूर यांच्या निधनाचे वृत्त आले. त्यामुळे मनोरंजनसृष्टी आणि चाहत्यांना गुरुवारी आणखी एक मोठा धक्का बसला. मागील दोन वर्षापासून ते कर्करोगाशी लढत होते. इरफान आणि ऋषी कपूर यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोशल मीडियावर त्यांना लाखो चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहीली. असे असताना सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी मात्र या दोन कलावंतांच्या निधनावर खोचक ट्विट केलं आहे. त्यामुळे काटूज यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

काटूज यांनी 1 मे रोजी हे ट्विट केलं आहे. सिनेविश्वातल्या दोन अभिनेत्यांच्या निधनानं देशातील जनता दु:खी आहे. रडत आहे. परंतु कोट्यावधी मजूर स्थलांतरामुळे उपाशी आहेत, मजूरांचे हाल होतायत. त्याचं कोणाला काही वाटत नाहीए, धन्य हो !. अशा प्रकारचं ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

या दोन अभिनेत्यांना गमावण्याचं दु:ख आहे. पण सोबतच मजूरांच्या मदतीसाठी आम्ही पुढं आलो आहोत, असे एका युजरने म्हटले आहे. तर तुम्ही म्हातारे झाले आहेत, आराम करा असा सल्ला एका नेटकऱ्यानं काटजू यांना दिला आहे. तर हेच जर तुमच्यासोबत झालं असतं तर त्याचीही बातमी झाली असती. पण माझ्यासोबत झालं असतं तर बातमी झाली नसती. चर्चेत राहण्यासाठी उगाच ट्विट करू नका, असे एकाने म्हटले आहे.