Birthday Special : बॉलिवूडमधील ‘तो’ व्हिलन ज्याच्या भीतीनं थिएटरमध्ये किंचाळायच्या मुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एक असा काळ होता जेव्हा लोक आपल्या मुलाचं नाव प्राण ठेवत नव्हते. जेव्हा प्राण पडद्यावर बल्बसारखे रूबाबदार डोळे दाखवायचे तेव्हा लोकांच्या अंगावर काटा यायचा. मुली तर भीतीनं किंचाळायच्या. सिनेमात खलनायक असणारा हा माणूस खऱ्या आयुष्यात मात्र नायकाच्याही वरचा होता. लोक त्यांचा जेवढा सन्मान करत होते तेवढेच त्यांच्या दिलदारपणाचे फॅन होते,

प्राण यांनी 40 च्या दशकात आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी नायकाची भूमिका साकरली होती. परंतु त्यांना खरी ओळख मिळाली ती म्हणजे खलनायकाच्या भूमिकेनंच.

प्राण यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1920 रोजी झाला होता. त्यांचे वडिल कृष्ण सिकंद सरकारी ठेकेदार होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राण वडिलांच्या कामात हातभार लावू लागले. एकदा प्राण लाहोरचे प्रसिद्ध पटकथा लेखक वली मोहम्मद यांना भेटले. यावेळी वली यांनी प्राणला सिनेमात काम करण्याचा प्रसताव दिला. त्यावेळी प्राणनं नकार दिला. परंतु वारंवार म्हटल्यानंतर ते यासाठी तयार झाले.

1940 साली आलेल्या एका पंजाबी सिनेमातून प्राणनं आपल्या करिअरला सुरुवात केली 1945 साली त्यांचा खलनायक म्हणून पहिला सिनेमा आला. एक असा जमाना होता प्राण सिनेमात आहे यातच सिनेमाचं यश समजलं जायचं.

1948 साली त्यांनी जिद्दी सिनेमात काम केलं. यानंतर त्यांनी ठरवलं की, आता खलनायकीमध्ये आपलं करिअर करायचं. प्राण यांनी किमान 40 वर्षांपर्यंत खलनायक म्हणून काम केलं.

प्रत्येक दुसऱ्या सिनेमात खलनायक म्हणून प्राणच दिसत असे. प्राण यांना 2001 मध्ये भारतीय सिनेमातील त्यांच्या योगदानासाठी पद्म भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

प्राण यांनी प्रामुख्यानं जिद्दी, बडी बहन, उपकार, जंजीर, डॉन, अमर अकबर अँथनी आणि शराबी अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. त्यांनी 350 हून अधिक सिनेमात काम केलं आहे. मृत्यूदाता हा त्यांचा अखेरचा सिनेमा आहे.