Drug Abuse Case : ड्रग्स प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री रागिनी द्विवेदीला चौकशीसाठी समन्स !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत सुसाईड केसचा तपास करताना आता ड्रग अँगल समोर आला आहे. याचा तपास आता नारकोटीक्स कंट्रोल ब्युरो करत आहे. ड्रग्सच्या वापराचा एक तपास कन्नड फिल्म इंडस्ट्रीतही सुरू आहे. या प्रकरणी आता कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिला पोलिसांच्या सेंट्रल क्राईम ब्रांचनं (सीसीबी) चौकशीसाठी समन्स बजावला आहे.

21 ऑगस्ट रोजी पोलिसांनी काही हायप्रोफाईल ड्रग्स पेडलर्सला पडकलं होतं जे कन्नड फिल्म इंडस्ट्रीत सप्लाय करतात. ज्यानंतर आता नारकोटीक्सचा तपास सुरू आहे. यात अनेक सेलेब्सची नावं समोर आली आहेत. एका इंग्रजी वृत्तानुसार, रागिनीचा मित्र रवी यानं अटकेनंतर रागिनीचं नाव घेतलं आहे. यामुळं पोलिसांनी तिला नोटीस पाठवत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. रागिनीला आता ड्रग रॅकेटशी तिच्या कनेक्शन संबंधित सवाल केले जाणार आहेत.

एका रिपोर्टनुसार, पोलिसांना एका डायरीत काही सेलेब्स आणि मॉडेल्सची नावं सापडली आहेत. यानंतर डायरेक्टर इंद्रजीत लंकेशनं खळबळजनक खुलासा करत काही नावं जाहीर केली होती. क्राईम ब्रांचचे जॉईंट कमिश्नर संदीप पाटील यांच्या नुसार, सीसीबी पुरावे शोधण्याचं काम करत आहेत. पोलिसांनी इंद्रजीतचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले आहेत.

रागिनीनं काही दिवसांपूर्वीच ड्रगबद्दल ट्विट केलं होतं. ती म्हणाली होती की, “ड्रग सारख्या समस्येचं लवकर समाधान व्हायला हवं. हा आपल्या समाजासाठी प्लेगसारखा आहे. नामांकीत सेलिब्रिटींना यात ओढणं रॅकेटला सावध करण्यासारखं आहे. जे यात खरंच अॅक्टीव आहे त्यांना यामुळं लपायला संधी मिळेल. आपला मीडिया देखील याकडे खूप लक्ष देत आहे आणि अफवांच्या आधारावर सँडलवुडला टारगेट करत आहे. मुद्द्याचं बोला.”