Tandav Controversy : UP पोलिसांनी 4 तासांच्या चौकशीनंतर नोंदवला लेखी जबाब ! डायरेक्टरसह ‘या’ तिघांची झाली चौकशी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अ‍ॅक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अ‍ॅक्ट्रेस डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची तांडव (Tandav) या अ‍ॅमेझॉन प्राईमवरील वेब सीरिजमुळं नवा वाद सुरू झाला आहे. भगवान शंकराचा अपमान करत हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप या सीरिजवर होत आहे. सध्या ही सीरिज बॅन करण्याची मागणी सुरू आहे. सीरिजचे मेकर्स आणि कलाकारांविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. वादानंतर मेकर्सनी माफीही मागितली आहे. तरीही यावरील वाद सुरूच आहे. आता एकूण 6 शहरांमध्ये सीरिज विरोधात FIR दाखल झाल्यानंतर युपीचे लखनऊ पोलीस मेकर्सची चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते.

लखनऊ पोलिसांच्या टीमनं शुक्रवारी याच्याशी संबंधित 3 लोकांचा लेखी जबाब नोंदवला आहे. यात सीरिजचे डायरेक्टर अली अब्बास जफर, रायटर गौरव सोलंकी आणि निर्माता हिमांशू मेहरा यांच्या नावाचा समावेश आहे. अ‍ॅमेझॉन प्राईमच्या हेड अपर्णा पुरोहित मुंबईत नसल्यानं त्यांचा जबाब नोंदवणं शक्य झालेलं नाही. त्या दिल्लीत आहेत. त्यांना फोनवरच त्यांचा जबाब देण्यासाठी सांगितलं गेलं.

याआधीही शुक्रवारी सकाळी युपीच्या लखनऊ पोलिसांची टीम मरोल भागात एक हॉटेलात या तिघांचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली होती. परंतु काही कारणांमुळं जबाब नोंदवण्याची जागा बदलली. समोर आलेल्या माहितीनुसार, अंधेरी भागातील एका इमारतीत नोंदवण्यात आला. यावेळी लखनऊ पोलिसांच्या टीमनं तिघांची जवळपास 4 तास चौकशी केली आणि त्यांचा लेखी जबाब नोंदवला.

याआधीही लखनऊ पोलीस गुरुवारीच तिघांच्या घरी जबाब नोंदवण्यासाठी गेले होते. परंतु जेव्हा ते घरी गेले सापडले नाही तेव्हा त्यांना 27 जानेवारी रोजी हजरतगंज पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस देण्यात आली. परंतु शुक्रवारी तिघांनी आपला जबाब नोंदवण्यासाठी लखनऊ पोलिसांशी संपर्क साधला. आता तिघांचा जबाब नोंदवल्यानंतर लखनऊ पोलिसांची टीम परत जाण्यासाठी मुंबईतून रवाना झाली आहे आणि परतल्यानंतर ही टीम त्यांचा तपास अहवाल हा अधिकाऱ्यांकडे सोपवणार आहे.