TikTok Controversy: ‘अ‍ॅसिड हल्ले’ आणि ‘लैंगिक शोषणा’स प्रोत्साहित करणार्‍या व्हिडिओंवर ‘टिकटॉक’नं काय म्हटलं, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून टिकटॉक चर्चेचा विषय ठरले आहे. आधी टिकटॉक विरुद्ध यूट्यूब चे प्रकरण समोर आले होते. यानंतर फैजल सिद्दीकीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरण्यास सुरवात झाली, ज्यात लैंगिक हिंसाचार आणि प्राण्यांवरील अत्याचाराचा आरोप केला जात आहे. आता या सर्वांच्या दरम्यान टिकटॉकने एक पोस्ट केली आहे, ज्यात टिकटॉकने काही स्पष्टीकरण दिले आहे.

टिकटॉक इंडियाने एक ट्विट करून दोन फोटो शेअर केले आहेत. त्यासोबतच आपल्या मार्गदर्शक सूचनांविषयी देखील माहिती दिली. त्यांनी लिहिले, ‘टिकटॉक हे सर्जनशीलता आणि अभिव्यक्तीला साजरा करणारे व्यासपीठ आहे. आमचा हेतू अ‍ॅपमध्ये असे वातावरण निर्माण करण्याचा आहे जे की लोकांना आणि समुदायांना एकत्र आणू शकेल. आम्ही सर्व वापरकर्त्यांना या उद्देशाचा आदर करण्याची विनंती करतो. अधिक माहितीसाठी आपण आमची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे वाचू शकता.’ याशिवाय टिकटॉकने काय करावे आणि काय करू नये याचा फोटो देखील जारी केला आहे.

त्याचवेळी, टिकटॉकने अलीकडेच व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओंबद्दल आपला अभिप्राय देखील दिला. त्यांनी लिहिले की गेल्या काही दिवसांमध्ये आम्हाला असे आढळले आहे की काही व्हिडिओ आमच्या धोरणांच्या विरोधात आहेत. त्यामुळे आम्ही सामग्री हटविणे, संबंधित वापरकर्त्यांची खाती सस्पेंड करण्यासह अनेक पावले उचलली आहेत. आम्ही कायदेशीर एजन्सीसमवेत काम करत आहोत. आम्ही आमच्या वापरकर्त्यांसाठी एक सुरक्षित आणि उपयुक्त वातावरण तयार करण्यासाठी सतत कार्यरत आहोत.

विशेष म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाने काही व्हिडिओवर कारवाई करण्यास सांगितले होते. त्यातच मंगळवारी टिकटॉकने फैजल सिद्दीकीचे खाते ब्लॉक केले. याशिवाय सोशल मीडियावरील लोक टिकटॉकला सतत विरोध व पाठिंबा देत आहेत. याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा सतत कार्यरत असतात.