‘वरुण धवन-नताशा दलाल’ याच महिन्यात बांधणार लग्नाची गाठ ! अलिबागमध्ये बुक केलं हॉटेल

पोलीसनामा ऑनलाईन : वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) यांच्या लग्नाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. या महिन्याच्या अखेरीस हे दोघेही लग्नाची गाठ बांधणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षी मे मध्ये वरुण (varun dhawan) -नताशाचे लग्न होणार होते, परंतु कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे या दोघांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते.

वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नासाठी अलिबाग (Alibaug) मधील एक हॉटेल बुक करण्यात आले आहे. लग्न पंजाबी चालीरिती प्रमाणे असेल. पिंकविला च्या अहवालानुसार 200 लोक लग्नाला हजेरी लावतील. अलीकडेच वरुण धवन यासंदर्भात अलिबागमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचला होता. वरुण धवन आणि नताशा दलाल अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनाही अनेक खास प्रसंगी एकत्र पाहिले गेले आहे. या जोडप्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

कॉफी विथ करण सीझन 6 मध्ये वरुण धवनने खुलासा केला होता की तो नताशा दलालला डेट करत आहे. लवकरच लग्न करणार असा इशाराही त्याने दिला होता. वरुण धवनने सांगितले होते की शालेय काळापासूनच नताशाने त्याला खूप साथ दिली आहे. चांगल्या किंवा वाईट अशा प्रत्येक प्रसंगी ती त्याच्याबरोबर होती. अभिनेत्याने तर आपल्या कारकीर्दीच्या पहिल्या अनेक वर्षांमध्ये नताशाशी असलेले आपले नाते चर्चेत येऊ दिले नाही. परंतु वाढत्या काळासह अनेक विशेष प्रसंगी या जोडप्याच्या उपस्थितीमुळे हे स्पष्ट झाले की दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत.

वरुण धवनने नुकतेच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, तो 2021 मध्ये नताशाबरोबरचे आपले नाते पुढच्या स्तरावर नेईल. वरुण म्हणाला की गेली दोन वर्षे प्रत्येकजण माझ्या लग्नाबद्दल बोलत आहे, पण अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. वरुणने म्हटले की, जगात अजूनही संभ्रमाची परिस्थिती आहे. यावर्षी परिस्थिती सुधारेल तेव्हा आम्ही लग्न करू शकतो. माझा विश्वास आहे की आम्ही याबद्दल विचार करीत आहोत, परंतु जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने विचार करू.

अधिक माहिती म्हणजे नताशा दलालने फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात पदवी मिळविली आहे. 2013 साली नताशाने फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी न्यूयॉर्कमधून आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेतल्यानंतर नताशाने स्वतः डिझायनिंग क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली आणि आज या उद्योगातील एक नावाजलेली व्यक्ती म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिचा एक कपड्यांचा ब्रँडदेखील आहे, जो बॉलिवूडच्या टॉप स्टार्सनी पसंत केला आहे.