‘बॉलिवूडमध्येही आहेत नीरव मोदी अन् मल्ल्या’ : शिवसेना

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडला बदनाम करणाऱ्या मंडळींना शिवसेनेनं झोडपून काढलं आहे. हिंदी सिनेसृष्टीचा लौकिक जागतिक स्तरावर आहे. हॉलिवूडच्या बरोबरीनं बॉलिवूडचं नाव घेतलं जातं. परंतु उद्योगांमध्ये जसे टाटा, बिर्ला, नारायण मूर्ती आहेत तसेच नीरव मोदी, मल्ल्याही आहेत. बॉलिवूडचंही तसंच आहे असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

सुशांतच्या निमित्तानं बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन सध्या जोरदार चर्चेत आहे. बॉलिवूडमधील काही मोजकी मंडळी सर्वांवर सरसकट आरोप करताना दिसत आहे. खासदार जया बच्चन यांनी काल राज्यसभेत याविरोधात आवाज उठवला आणि बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांवर सडकून टीका केली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं जया बच्चन यांची पाठराखण केली आहे. इतकंच नाही तर सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या काही कलाकारांवर टीकाही केली आहे. तसेच पडद्यावर सुपरहिरोच्या भूमिका करणाऱ्या परंतु प्रत्यक्षात मात्र महत्त्वाच्या मुद्द्यांवर मूग गिळून बसणाऱ्या कलाकारांवरही निशाणा साधला आहे.

शिवसेनेनं म्हटलं आहे की, “सिनेसृष्टीची यथेच्छ बदनामी आणि धुलाई सुरू असताना एरवी तांडव करणारे भलेभले पांडव तोंडात मीठाची गुळणी घेऊन गप्प बसले आहेत. जणू ते अज्ञात दहशतीखाली जगत आहेत किंवा कोणीतरी त्यांचे वागणे, बोलणे पडद्यामागून नियंत्रित करत आहे. पडद्यावर शूर, लढवय्यांच्या भूमिका करून वाहवा मिळवणारे अचाट अफाट कलावंतही मनाने आणि विचाराने कुलूपबंद होऊन पडले आहेत. अशा वेळेस जया बच्चन यांची बिजली कडाडली आहे.”

पुढे बोलताना शिवसेना म्हणते, “हिंदुस्तानी सिनेसृष्टीत एक परंपरा आणि इतिहास आहे. या मायानगरीत जसे मायावी लोक आले आणि गेले तसेच अनेक संतसज्जनही होतेच. हिंदुस्तानी सिनेसृष्टीचा पाया रचणारे दादासाहेब फाळके देखील महाराष्ट्राचेच होते. त्यांनी मोठ्या कष्टातून या साम्राज्याचे तोरण बांधले. एकापेक्षा एक सरस कलाकारांचे योगदान हिंदी सिनेसृष्टीला आहे. पडद्याचे बॉक्स ऑफिस खुळखुळत ठेवायला आमिर, शाहरुख, सलमान अशा खान मंडळींची मदत झालीच आहे. हे सर्व लोक फक्त गटारातच लोळत होते आणि ड्रग्स घेत होते असा दावा कोणी करत असेल तर बकवास करणाऱ्यांच्या तोंडाचा वास आधी घ्यायला हवा. स्वत: शेण खायचं आणि दुसऱ्याचे तोंड हुंगायचे असाच प्रकार सध्या सुरू आहे.”