‘माँ वैष्णो देवी’ ते ‘देवों के देव महादेव’ सारख्या अनेक धार्मिक सिरीयलमध्ये दिसली अभिनेत्री, ड्रग्स घेताना अटक!

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मादक पदार्थांच्या खरेदीच्या आरोपाखाली नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री प्रितिकासोबत फैजल नावाच्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर एजन्सीने आरोपीला न्यायालयात हजर केले. आरोपीजवळ 99 ग्रॅम भांग सापडला असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहे प्रितीका चौहान ?
प्रितिका हिमाचल प्रदेशमधील कारसोगची रहिवासी असून बीटेक पदवीधर आहे. या अभिनेत्रीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2016 मध्ये प्रदर्शित झमेला या चित्रपटाने केली होती. यानंतर तिने अनेक फिल्मी सीरियलमध्ये काम केले आहे. संकटमोचन महाबली हनुमान या मालिकेत अभिनेत्रीने साचीची भूमिका केली होती. संकटमोचन महाबली हनुमान व्यतिरिक्त ती सीआयडी आणि सावधान इंडियामध्येही दिसली आहे. या मालिकांव्यतिरिक्त, अभिनेत्री स्टार भारतचा शो जग जननी मां वैष्णो देवीमध्ये भूदेवीच्या भूमिकेत आणि ‘देवों के देव महादेव’ मध्ये दिसली होती. याशिवाय संतोषी मां-सुनाएं व्रत कहानियांमध्ये अभिनेत्री पार्वती म्हणून दिसली. या अभिनेत्रीने बहुतेकदा धार्मिक मालिकांमध्ये काम केले आहे आणि टीव्ही पडद्यावर तिची अनेक पात्रे देवी-देवतांची आहेत.

यापूर्वी एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. मात्र, काही दिवसांनी तिला जामिनावर सोडण्यात आले. तसेच, एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानवरही चौकशी केली होती. त्याचबरोबर कर्नाटक फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्सबाबत चौकशी सुरू आहे आणि तिथेही बऱ्याचं अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे.