मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुन्हा एकदा कोरोनाने सर्वत्रच थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाचे दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव पाहून सध्या प्रत्येकजण कोरोनापासून बचावासाठी घेता येईल तितकी खबरदारी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाहेर पडताना मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचेही पालन करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांना कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या अधिक आहे.
आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी, आमिर खान,आर. माधवन, गोविंदा आणि अक्षय कुमार यांच्यानंतर आता अभिनेत्री भूमी पेडणेकर हिलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. तिने सोशल मीडियावर ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. भूमी पेडणेकरने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिला कोरोनाची लागण झाल्याचे सांगत म्हटले की, “मला आज कोरोनाचे सौम्य लक्षण असल्याचे समजले आहे. पण मी बरी आहे आणि स्वतःला क्वारंटाइन केले आहे. मी माझे डॉक्टर आणि हेल्थ प्रोफेशनल्सच्या सूचनांचे पालन करते आहे.”
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यात रणबीर कपूर, आर. माधवन, मनोज वाजपेयी, आमिर खान, आलिया भट, फातिमा सना शेख, गोविंदा या कलाकारांचा समावेश आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर सध्या शुटिंग सुरू असलेल्या त्याच्या ‘राम सेतू’ चित्रपटातील सेटवरील तब्बल ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या सेटवर इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा विस्फोट झाल्यामुळे चित्रीकरण थांबविण्यात आले आहे.
इतकेच नाही तर अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या संपर्कात आलेल्या लोकांना स्वतःची कोरोना टेस्ट करून घेण्यास सांगतिली आहे. तसेच सध्याच्या स्थितीकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहनही तिने केले आहे. पुढे ती म्हणाली की, मी काळजी आणि सावधगिरी बाळगूनही मला कोरोनाची लागण झाली. मास्क घाला, हात स्वच्छ धुवा, सोशल डिस्टंसिंग पाळा. भूमी पेडणेकरला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर तिचे चाहते काळजी व्यक्त करत आहेत आणि तिला काळजी घेण्यास सांगत आहेत.