शिर्डी विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन-शिर्डी विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोस्टातून आलेल्या निनावी पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डी विमानतळ प्रशासनाला 26 नोव्हेंबरला निनावी पत्र प्राप्त झाले होते. पत्रात शिर्डीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीचे पत्र मिळाल्यानंतर विमानतळाचे व्यवस्थापक धीरेन भोसले यांनी राहाता पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राहता पोलिसांनी कलम 506 नुसार गुन्हा दाखल केला असून आज राहाता पोलिसांनी शिर्डी विमानतळाच्या सुरक्षेचाही आढावा घेतला. पोलिसांनी धमकीच्या चौकशीसाठी विशेष पथक तयार केलं आहे. वर्षभरापूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण झालं आहे. सध्या शिर्डी विमानतळावरून हैदराबाद, मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू या ठिकाणी दररोज विमान सेवा सुरु असून त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. मात्र धमकीच्या पत्रामुळे प्रवाशांमध्येही भीतीचं वातावरण आहे.