पुणे : पौडच्या वन क्षेत्रपाल कार्यालयात ‘बॉम्बस्फोट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पौड येथील वन क्षेत्रपाल कार्यालयात जप्त करुन ठेवलेल्या बॉम्बचा पहाटे स्फोट होऊन कार्यालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. या घटनेत वनक्षेत्रपाल कार्यालयाच्या सर्व खिडक्या, दरवाजे, शटर हे तुटून पडले आहेत. हा स्फोट इतका मोठा होता की, त्यात कार्यालयातील भिंतही पडली आहे. आतील कपाटे अस्ताव्यस्त झाली आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पौड गावात वन विभागाने वनक्षेत्रपाल कार्यालयासाठी भाड्याने जागा घेतली आहे. ताम्हिणी अभयारण्यात डुक्कर मारण्यासाठी बॉम्ब पेरण्यात आले होते. खाद्य समजून डुक्करांनी ते खाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा स्फोट होतो व त्यात डुक्कर मारतात. अभयारण्यात लावलेले हे ७० ते ८० बॉम्ब वन विभागाने जप्त केले. पौड येथील एका इमारतीत वन विभागाचे कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावरील या वनक्षेत्रपाल कार्यालयात हे बॉम्ब ठेवले होते.

ईदमुळे बुधवारी सुट्टी असल्याने रात्री कार्यालयात कोणीही नव्हते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, त्यात पहिल्या मजल्यावरील खिडक्या, दरवाजे तुटले. कार्यालयाचे शटर अनेक फुट दूर जाऊन पडले. आतील भागातील कपाटे, भिंतही पडली आहे.
हे बॉम्ब उंदरांनी कुरताडले अथवा त्यावर काही पडल्यामुळे त्यांचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.