(IED) बॉम्ब सापडलेल्या ‘त्या’ एसटी बसचा चालक निलंबित

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन – पनवेल तालुक्यातील आपटे येथे रात्रीच्या मुक्कामी असणाऱ्या एसटीमध्ये बॉम्ब सापडला होता. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करुन चालक गजानन जारंडे (वय-३१) हा अनधिकृत सामानाची वाहतूक करीत असल्याचे समोर आले. जारंडे याने एसटी महामंडळाची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये अनधिकृतपणे सामान घेतल्याबद्दल एसटी महामंडळाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे बॉम्बच्या घटनेने या चालकाचे अवैधपणे चाललेले धंदे समोर आल्याने त्याला निलंबित केल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

गजानन जारंडे हे कर्जत डेपोचे कर्मचारी असून २१ फेब्रुवारी रोजी अलिबाग कर्जत ही बस घेऊन निघाले होते. त्यावेळी अलिबाग येथून एका इसमाने त्याच्याकडे एक बॉक्स पेण येथे नेण्यासाठी दिला होता. याबाबत त्या इसमाने जारंडे याना काही रक्कम दिली होती. जारंडे यांनी तो बॉक्स आपल्या सीटच्या मागे ठेवला व पेण येथे आल्यावर दुसऱ्या इसमास दिला. कर्जत येथे अलिबाग कर्जत बस पोहचल्यानंतर दुसरी बस घेऊन चालक जारंडे कर्जतवरून आपटा येथे वस्तीसाठी आले.

त्यानंतर बॉम्ब एसटी बसमध्ये सापडला होता. या घटनेचा तपास करीत असता पोलिसांना पेण आगारातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये जारंडे अलिबागमधून घेतलेला बॉक्स दुसऱ्या इसमास देताना दिसले. त्यानंतर त्याची चौकशी केली असता, एसटी महामंडळाची फसवणूक करून अनधिकृतपणे सामानाची ने आण करण्याचे प्रकरण समोर आले आहे.

या फसवणुकीबाबत पोलिसांनी एसटी प्रशासनाला माहिती दिली असून त्याच्या आधारे गजानन जारंडे याना निलंबित केले असल्याचे विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले आहे. त्यामुळे एसटी बस मध्ये ठेवलेला बॉम्ब हा सुद्धा असाच कोणी चालकामार्फत दिला आहे का याची कसून चौकशी पोलीस करीत आहेत.

You might also like