मुंबईनंतर आता नाशिकमध्ये बिल्डरच्या घराबाहेर आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईतील परेड रोड परिसरात एका रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या सापडल्याने खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच आता नाशिकमधील एका प्रख्यात बिल्डरच्या घराबाहेर गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. जितूभाई ठक्कर या बिल्डरच्या घराबाहेर गावठी बॉम्ब सापडला आहे. ही घटना नाशिकच्या निशांत अपार्टमेंट शरणपूर रोड भागात घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांची कुमक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रख्यात बिल्डर जीतूभाई ठक्कर यांच्या घराबाहेर यांच्या घराबाहेर ही वस्तू आढळून आली आहे. एक टेनिस बॉल आढळून आला आहे. या बॉलमध्ये फटाक्यांची गन पावडर भरली होती. गन पावडर आणि अल्युमिनियम पावडरला फायबर कोटिंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा गावठी बॉम्ब बॉम्ब शोध पथकाच्या साहेबराव नवले यांनी निकामी केला आहे.

जेथे ही वस्तू सापडली तेथे अनेक व्यापारी संकुलं आणि प्रतिष्ठितांचे बंगले असलेला परिसर आहे. पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी दाखल झाली तसेच बीडीडीएस पथक पोहचलं. हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. कचरा गोळा करणाऱ्यांना ही वस्तू सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच हे कोणतंही मॉक ड्रिल नसल्याचा पोलिसांनी खुलासा केला आहे.