बेकायदा होर्डिंगप्रकरणी ‘त्या’ महापौर, आमदारांनी घेतले अंग काढून ; कार्यकर्ता लागला कामाला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महापौर, आमदार, स्थानिक नेते यांच्या वाढदिवशी त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही होर्डिंग लावणार असाल, तर सावधान. कारण अशा होर्डिंगबाबत काही प्रश्न उपस्थित झाला तर ते आपला काही संबंध नाही असे सांगून नामानिराळे राहण्याची शक्यता आहे.
महापौर मुक्ता टिळक आणि आमदार जगदीश मुळीक व स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांचा फोटो असलेले बेकायदा होर्डिंग लावण्यात आले होते. या होर्डिंगशी आपला संबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे मुक्ता टिळक आणि आमदार मुळीक यांनी उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे होर्डिंग लावणारे नगरसेवक राहुल भंडारी यांना उत्तर दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
नेत्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या भागात मोठ मोठी होर्डिंग लावून त्यांचे अभिनंदन करण्याची छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांची चुरस लागलेली असते. त्यानिमित्तााने त्यांच्या फोटोबरोबर आपलेही फोटो झळकविण्याची संधी ते घेत असतात. पण आता हे नेत्यांच्या नाही तर कार्यकर्त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. त्याला कारणच तसे घडले आहे.

‘कोणाला काहीही बोलू द्या, मी खासदार होणारच’ 

महापौर, आमदार यांचे फोटो असलेले बेकायदा होर्डिंग लावल्याचा प्रश्न कनीझ सुखरानी अवमान याचिकेद्वारे उच्च न्यायालयात मांडला आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. या बाबत महापालिकेने केलेल्या चौकशीत भाजपचे स्थानिक नगरसेवक राहुल भंडारी यांनी हे बेकायदा होर्डिंग लावल्याचे समोर आले आहे. महापौर आणि आमदारांनी प्रतिज्ञापत्राद्वारे या होर्डिंगशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केल्याने उच्च न्यायालयाने राहुल भंडारी यांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.