Mumbai : चहा न मिळाल्यानं पत्नीची केली होती हातोडयानं हत्या, कोर्ट म्हणालं – ‘संपत्ती नव्हती तुमची ती, शिक्षा कायम’

पोलिसनामा ऑनलाईन, दि. 25 फेब्रुवारी : पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या एका व्यक्तीच्या अपीलवर मुंबई हायकोर्टाने कोणतीही दया दाखविण्यास साफ नकार दिला आहे. तसेच सुनावणी दरम्यान, उच्च न्यायालयाने दोषीने केलेली विनंती फेटाळून लावली आहे. ज्यात त्याने म्हटले आहे की, पत्नीने चहा बनविण्यास नकार दिल्यामुळे आपल्याला चिथावणी दिली गेली. यावर मुंबई हायकोर्टानेे सांगितले की पत्नी ही मालमत्ता किंवा वस्तू नाही. पत्नीला मालमत्ता म्हणून मानण्याची मध्ययुगीन काळातील संकल्पना दुर्दैवाने अजूनही अनेकांच्या मानसिकतेत कायम आहे. या प्रकरणात 6 वर्षांच्या मुलीची साक्ष महत्वाची ठरली.

जाणून घ्या, काय आहे संपूर्ण प्रकरण :
महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात राहणारा 35 वर्षीय संतोष महादेव अटकर याचे पत्नीबरोबर अनेकदा भांडण होत होते. त्याला संशय होता की, ती त्याला फसवत आहे. 19 डिसेंबर 2013 रोजी पीडित मनीषा चहा न करता घराबाहेर पडली. त्यामुळे या जोडप्यात जोराचे भांडण झाले. यादरम्यान संतोषने रागाने पत्नीच्या डोक्यावर हातोडीने हल्ला केला.

गंभीर जखमी झाल्याने पत्नीचा रुग्णालयात झाला मृत्यू :
मनीषावर जोरात हातोडीने हल्ला केल्याने ती गंभीररित्या जखमी झाली होती. त्यानंतर पतीने रक्ताचे डाग साफ केले. त्यानंतर तिला उपचारासाठी दवाखान्यात नेले. मात्र, मनीषाचा 25 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुंबई हायकोर्टाने त्याला दोषी ठरवले :
हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि 1 जुलै 2016 रोजी पंढरपूर कोर्टाने संतोषला दोषी ठरवत 10 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच 5000 रुपये दंडही ठोठावला आहे.

अपील करून मागितली दाद पण, …
याच प्रकरणात संतोष महादेव अटकर यांच्या शिक्षेविरूद्ध केलेल्या अपिलावर उच्च न्यायालय सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान, न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांनी संतोषने केेलेली विनंती फेटाळून लावली. पत्नीने चहा बनविण्यास नकार दिला आणि त्याला भडकविले म्हणून त्याने हातोडीने तिच्यावर हल्ला केला. असे कारण संतोषने न्यायालयात सांगितले होते. या आधारावर त्याने दया मागण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावली. विवाह भागीदारीवर आधारित असल्याचे मत न्यायमूर्ती रेवती यांनी नाकारले. पत्नीला मालमत्ता म्हणून मानण्याचा मध्ययुगीन विचार चुकीचा आहे.

न्यायालयाने 6 वर्षाच्या मुलीच्या साक्षीवर ठेवला विश्वास :
इतकेच नव्हे तर, या जोडप्याच्या 6 वर्षाच्या मुलीच्या साक्षीवरही कोर्टाने विश्वास ठेवला. तिच्या वडिलांनी हातोडीने आईवर कसा हल्ला केला, ही घटना मुलीने पाहिली होती. तथापि, मुलीची साक्ष खालील  कोर्टाने फेटाळली होती. यावर हायकोर्टाने म्हटले आहे की, आईला अशा क्रूर मार्गाने गमावल्यामुळे मुलाला जी दुर्घटना सहन करावी लागली, ते ध्यानात घ्यावे लागेल. संतोषची शिक्षा कायम ठेवत कोर्टाने संतोषची याचिका फेटाळून लावली.