‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाविषयी न्यायालयाचा ‘हा’ महत्वपूर्ण निकाल

मुंबई : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम मोदी’ या चित्रपटाविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच हा चित्रपट अनेक वादांमुळे चर्चेत आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असलेल्या या बायोपिकला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने शुक्रवारी दखल घेत निवडणूक आयोगाला नोटीस बजावली होती. याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणीही न्यायालयाने मान्य करत सोमवारी सुनावणी ठेवली. पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावरून निर्माण झालेल्या वादात हस्तक्षेप करण्यास सोमवारी उच्च न्यायालयाने नकार दिला. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आहे आणि आता ते हे प्रकरण हाताळणार आहेत,’ असे म्हणत न्यायालयाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय) चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी केलेली जनहित याचिका निकाली काढली. याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली आणि उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

म्हणून बंदी घालण्याची मागणी –

आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची आचारसंहिता सध्या देशभर लागू आहे. त्यामुळे आता हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर ते आचारसंहितेचे उल्लंघन होईल. शिवाय आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदी यांना या चित्रपटामुळे मोठय़ा प्रमाणावर राजकीय फायदा होईल. म्हणूनच सध्या तरी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली होती.