देशद्रोहाच्या आरोपावरून अटकेतील शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या ‘उर्वशी’ला हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेला ‘जेएनयू’चा विद्यार्थी शरजील इमाम याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यानं अडचणीत सापडलेली ‘टिस’ची विद्यार्थिनी उर्वशी चुडावालाला हिला मुंबई हायकोर्टानं आज दिलासा दिला आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामुळे ती अडचणीत झाली होती. तसेच उर्वशीला अटक केल्यास २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले होते.

देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यावर उर्वशीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी अर्ज केला होता. ज्या प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टानं उर्वशीला दिलासा देत तिला अटक केल्यास २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका करण्याचे अंतरिम आदेश पोलिसांना दिले आहेत. सोबतच उर्वशीला १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आणि नंतर पोलीस बोलावतील, त्यावेळी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, सुनावणी वेळी उच्च न्यायालयानं देशद्रोहाच्या आरोपाबद्दलचे कलम लावण्यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले का? अशी विचारणा केली. त्यावर मार्गदर्शक तत्त्वांनुसार विधी अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतला नसल्याचं उत्तर सरकारी वकिलांनी दिलं. त्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी उर्वशीला अंतरिम दिलासा देत कोर्टाच्या परवानगीविना मुंबई आणि ठाण्याबाहेर जाऊ नये, अशी अटही घातली.