Coronavirus : काय सांगता ! होय, ‘त्या’ नामांकित हॉस्पीटलच्या डॉक्टरला ‘कोरोना’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व नर्स यांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे या आधी आपण पहिले आहे. आता बॉम्बे हॉस्पिटल मधील एका डॉक्टरला कोरोना संसर्गाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. या डॉक्टरने अनेक रुग्ण आणि गर्भवती महिलांवर उपचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने बॉम्बे हॉस्पिटल सील करण्याची मागणी कर्मचारी वर्गाकडून केली जात आहे.

कोरोना संसर्गित असलेला हा डॉक्टर बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी विभागात कार्यरत आहे. तसेच या डॉक्टरने अनेक रुग्ण आणि गर्भवती महिलांवरती उपचार केले आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. आता या डॉक्टरसह त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व रुग्णांची, कुटुंबाची, नातेवाईकांची आणि रुग्णालयातील सर्व कर्मचारी वर्गाची तपासणी करण्याची मागणी होत आहे. तसेच हॉस्पिटलसह आजूबाजूला असलेला एक किलोमीटरचा परिसर सील करण्याची मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे. दरम्यान, धारावीतल्या सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या एका नर्सला कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात कोरोना संसर्गाच्या २२१ रुग्णांची नोंद झाली. तर एकूण रुग्ण संख्या १९८२ झाली आहे. २१७ रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त होऊन घरी गेले आहे. सध्या राज्यातील १६१६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर राज्यातील ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहे. प्रयोगशाळेत पाठवलेल्या ४१ हजार १०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. त्यातील १९८२ जण पॉझिटिव्ह आलेत. तर कोरोना संसर्गामुळे गेल्या २४ तासात २२ बळी गेले असून एकूण बळींची संख्या १४९ झाली आहे.