Shreedevi : श्रीदेवींच्या त्या साडीचा लिलाव सुरु ; एवढ्या लाखांपर्यंत पोहोचली बोली  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत आहे. याच निमित्ताने कपूर कुटुंबीयांनी नवीन पाऊल टाकले आहे. येत्या २४ फेब्रुवारीला श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. कपूर कुटुंबीयांनी श्रीदेवींच्या साडीचा ऑनलाईन लिलाव ठेवल्याचे समजत आहे. हि लिलाव अद्याप सुरू असून आतापर्यंत या साडीला १ लाख २५ हजार पर्यंतची बोली लागली आहे असेही समजत आहे.

श्रीदेवी यांच्या अचानक जाण्यानं फिल्म इंडस्ट्रीपासून ते सामान्य माणसांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त कपूर कुटुंबीयांनी वेगळे पाऊल टाकले आहे. १४ फेब्रुवारी रोजी कपूर कुटुंबीयांनी चेन्नईत खास पूजा ठेवली होती. यानंतर आता त्यांच्या साडीचा लिलाव होत आहे. श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवींच्या ‘कोटा साडी’चा लिलाव ठेवला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या बोलीला ४० हजारांपासून सुरुवात झाली असून ही बोली आता १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे असेही समजत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या लिलावातून मिळणारी रक्कम ही समाज हितासाठी वापरली जाणार आहे. यातून मिळणारी रक्कम अनाथ मुलं आणि वृद्धांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेला देण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीदेवी यांना डिझायनर कपड्यांची आवड होती. साउथ इंडियन प्रकारातील कोटा साडी ही श्रीदेवी यांची ओळख होती. मुख्य म्हणजे श्रीदेवी बाॅलीवूडमधील फॅशन आयकाॅन म्हणूनही ओळखल्या जायच्या.