बोगस वाहन परवाना विकणारी गँग पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शहरामध्ये वाहन चोरीबरोबरच बनावट वाहन परवाना विकणाऱ्या गँगला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही टोळी दहा हजार रुपयात बनावट वाहन परवाना विकत होती. या टोळीची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ९ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता २६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ताहीर हुसैन सरदार हुसैन शेख आणि सायना सैद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे.

दहा हजार रुपयात ही गँग बनावट ड्रायव्हिंग लायसन्स देत असल्याचे तपासात पुढे आले आहे. या आरोपींनी पाचशे ते सहाशे लोकांना बोगस ड्रायव्हिंग लायसन्सची विक्री केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितले. आरोपींकडून पोलिसांनी २० पेक्षा अधिक बोगस  ड्रायव्हिंग लायसन्स, एक संगणक, सीपीयु, स्कॅनर मशिन, प्रिंटर आणि इतर दस्तावेज जप्त केले आहेत.

मुंबई शहरात बोगस ड्रायव्हिंग लायसन्स बनविणारी गॅंग कार्यरत असून हुबेहुबे दिसणारे ड्रायव्हिंग लायसन्स बनवून त्याची गरजू लोकांना दहा हजार रुपयांना विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ९च्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या गॅंगमधील दोन म्होरके खार परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आशा कोरके, सुधीर जाधव, विजय अंबावडे, विकास सावंत, पेडणेकर आदी पथकांनी खार परिसरात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यावेळी तिथे बोगस ड्रायव्हिंग लायसन्स विक्रीसाठी आलेल्या ताहीर खान आणि सायना खान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीत ते दोघेही ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प परिसरातील रहिवाशी असून ताहीर हा त्याच्या घरातच बोगस ड्रायव्हिंग लायसन्स तयार करुन सायना हिला देत होता. त्यानंतर सायना ही गरजू लोकांना एक परवाना दहा हजार रुपयांना विकत होती. या दोघांनी आतापर्यंत पाचशे ते सहाशे बोगस ड्रायव्हिंग लायसन्स विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या गुन्ह्यात अन्य काही जणांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.