ST कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस : अनिल परब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस दिला जाईल, अशी घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली. एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचा पगार देण्यात येणार असून, एक महिन्याचा पगार तात्काळ जमा होईल, अशी माहितीही अनिल परब यांनी वार्ताहरांना बोलताना दिली.

अनिल परब म्हणाले, दिवाळीपूर्वी एका महिन्याचे वेतन असे एकूण दोन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे. हे तात्पुरते संकट असून, एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, ही नम्र विनंती, असे आवाहनही त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. दोन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे. ज्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्याबाबत अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू आहे. आज एका तासात एक पगार सणाची अग्रीम रक्कम देण्यात येईल, अशी माहितीसुद्धा परब यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पत्रक जारी

एसटी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांतील पगार देण्यासाठी पत्रकही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जारी केले आहे. त्यावरती थकीत पगाराचा निधी मध्यवर्ती कार्यालयाकडून वळता करत तातडीने कर्मचारी, अधिकाऱ्यांना त्यांचे देय वेतन द्यावे, असे या आदेशात म्हटले आहे. या पत्रात टाळेबंदीमुळे एसटीला पुरेसे उत्पन्न मिळाले नाही म्हणून तीन महिन्यांचे वेतन थकल्याचे मान्य करण्यात आले आहे.

दोन कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग

वेतन रखडल्याने रत्नागिरी डेपोत काम करणाऱ्या एका एसटी चालकाचा मृतदेह भाड्याच्या घरात आढळून आला. पांडुरंग गडदे असे या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. दुसरीकडे जळगाव आगारात काम करणाऱ्या मनोज अनिल चौधरी (३०) या कर्मचाऱ्याने एसटी महामंडळातील कमी पगार, अनियमिततेला कंटाळून आत्महत्या केल्याचं सोमवारी सकाळी उघडकीस आलं. त्यानंतर टीकेचे धनी झालेल्या ठाकरे सरकारने तातडीने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि एका महिन्याचा पगार देण्यात येणार असल्याची घोषणा केली.