औरंगाबादमध्ये क्रिकेटच्या मॅचवर सट्टा घेणार्‍या बुकी बाप-लेकाला अटक, खेळणार्‍यांच्या नावांची यादी आली समोर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – आयपीएलच्या सामन्यावर एका छोट्याशा खोलीत अत्यंत गुप्त पध्दतीने मोबाईलद्वारे सट्टा घेणा-या बुकी बाप- लेकाला पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने छापा टाकून अटक केली आहे. पोलिसांनी य़ा घरातून मोबाईल, राऊटर, डायरी असा सुमारे 80 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

नेमीचंद शांतीलाल कासलीवाल (वय 56) आणि आकाश नेमीचंद कासलीवाल (वय 25, दोघेही रा. काचीवाडा) अशी अटक करण्यात आलेल्या बाप- लेकांची नावे आहेत. या दोघांकडून रॅकेटची अजून माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशभरात आयपीएलची धूम सुरु आहे. याच सामन्यावर शहरातील बाप- लेकांनी मोठ्या प्रमाणात सट्टा घेत असल्याची माहिती पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. पंटरच्या मदतीने लोकेशन ट्रेस करून 10 बाय 10 च्या खोलीत छापा टाकला. त्यावेळी दोघेही आरोपी बुकी घेतांना आढळून आले.

घटनास्थळावरून हस्तगत केली डायरी
पोलिसांना ग्राहकांच्या नावांची, व्यवहाराची डायरी घटनास्थळी मिळाली आहे. यात गेल्या चार दिवसात 70 ते 80 लाखांचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. देवानंद, गोट्या शिरसाट, सचिन, ओम, अक्षय भारत, आदित्य, सिंकदर, कृष्णा, अनिल, जीवन, हेमंत, नासेर, आकाश, आनंद, रवी, साकला, योगेश आदी नावे आढळली असून 5 हजारापासून ते 10 हजारापर्यंत ही मंडळी सट्टा लावत होती. नावे अर्धवट असल्याने ही नावे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. शहरात गल्लीबोळापासून ते उच्चभ्रू वसाहातीमध्ये हे रॅकेट सक्रीय आहे. शहरात सुमारे 100 ते 200 एजंटामार्फत सट्टा घेतले जात असल्याचे समोर आले आहे. गेल्या चार दिवसात एका व्यक्तीकडून 70 ते 80 लाखांचा व्यवहार झाल्याचे उघड झाल्याने या रॅेकटचा धंदा कोटीत असल्याची चर्चा आहे.

मास्टरमाईंड दगडा फरार
काही दिवसांपूर्वी जिन्सी पोलिसांनी छापा टाकत एका आयपीएल सामन्यावर सट्टा घेणा-या एजंटाला पकडले होते. तपासात दगडा नावाचा व्यक्ती हा मास्टरमाईंड असल्याचे समोर येताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच दगडा पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.