पाडव्याच्या मुहुर्तावर ग्राहकांसाठी खुशखबर, सोन्याच्या दरात घसरण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नसराईच्या काळात किंवा कुठल्या सणासुदीला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते.  मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढले होते. सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे आता पाडवा आणि अक्षयतृतीयाच्या मुहुर्तावर सामान्यांसाठी खुशखबर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया मजबूत झाल्यामुळे देशात गेल्या महिन्यापासून सोनं ५.७६ टक्के स्वस्त झालं आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना सोनं खरेदी करण्याची उत्तम संधी आली आहे.

सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांनी अक्षयतृतीयेसाठी आतापासूनच ऑर्डर देण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन महिन्यांपेक्षा मार्चमध्ये सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. त्यामुळे या महिन्यात जानेवारी, फेब्रुवारीच्या तुलनेने सोने खरेदीमध्ये वाढ झाल्याची माहिती सोने विक्रेत्यांनी दिली आहे. काल (दि. १९ मार्चला) सोने ३१,९०० रुपये होते तर आज (दि. २० मार्च) सोन्याचा भाव ३१,११० रुपये आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही सोने खरेदी करण्यासाठी योग्य वेळ म्हणता येईल

कशी कराल खऱ्या दागिन्यांची पारखं

आजकाल खऱ्या दागिन्यांच्या सोबतच इमिटेशन ज्वेलरी किंवा नकली दागिने देखील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. सोन्या-चांदीच्या किंवा इतर मौल्यवान रत्नांनी बनलेल्या दागिन्यांची खरेदी आपण शक्यतो आपल्या ओळखीतील आणि खात्रीशीर जव्हेऱ्यांकडेच करीत असतो. तरी अनेकदा चोख दागिना देण्याच्या बहाण्याने नकली दागिने किंवा रत्ने दिल्याच्या घटना सर्रास घडताना आपण ऐकत असतो. एखादा दागिना घ्यायचा झाला, तर त्यासाठी आपल्या मेहनतीचे पैसे आपण मोजत असतो, त्यामुळे इतके पैसे खर्च करून विकत घेतलेला जिन्नस चोख असावा ही आपली अपेक्षा योग्यच असते. आपण घेत असलेला दागिना चोख आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी काही पर्याय अवलंबता येतील.

दागिना खरेदी करताना सर्वात आधी त्यावर ‘हॉलमार्क’ किंवा आपण ज्यांच्याकडून दागिना खरेदी करीत आहोत त्यांचा ट्रेडमार्क त्यावर असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच दागिना ज्या धातूने बनलेला आहे, त्याची शुद्धता देखील या ट्रेडमार्कमध्ये अंकित असते. दागिन्यामध्ये चोख धातूची मात्रा जास्त असल्यास हा दागिना लोहचुंबकाला पटकन चिकटणार नाही. पण धातूमध्ये इतर कमी दर्जाच्या धातूची भेसळ असल्यास तो धातू लोहचुंबकाला पटकन चिकटतो. सोन्याची पारख करताना दागिना ‘अनग्लेझ्ड’ टाईलवर घासून पाहिल्यास टाईलवर सोनेरी डाग येतील. जर सोने शुद्ध नसेल, तर टाईल वर उठणारे ओरखडे राखाडी किंवा काळसर रंगाचे दिसतात. सोने चोख आहे किंवा नाही हे पाहण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे व्हिनेगर. व्हिनेगर दागिन्यावर टाकले असता, दागिन्यातील सोने चोख नसेल, तर दागिना लगेच काळा पडल्याचे दिसून येते.

हातात घातलेली चांदीची अंगठी जर शुद्ध चांदीची असेल, तर जिथे त्या दागिन्याला सतत पाणी, तेल किंवा इतर तत्सम पदार्थ लागत असेल, तेथील त्वचा निळसर दिसू लागते. तसेच चांदीच्या जिन्नसावर खडू घासला असता, जर चांदी शुद्ध नसेल, तर ज्या ठिकाणी खडू घासला आहे तो भाग त्वरित काळा पडू लागतो. त्यावरून दागिन्यातील चांदी शुद्ध असल्याचे समजू शकते. प्लॅटीनम चांदी प्रमाणेच शुभ्र दिसते. याचा दागिना चोख आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी अमोनियाचा वापर करता येतो. अमोनियाचे काही थेंब दागिन्यावर टाकले असता, धातू चोख नसल्यास तो त्वरित काळा पडतो.