सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद बेंद्रे यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर गावठाण येथे राहणारे सीमा सुरक्षा दलाचे प्रसाद प्रकाश बेंद्रे (वय २७) यांचे मणिपूरमध्ये कर्तव्य बजावत असताना निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी दिल्लीहून पुण्यात आणण्यात आले असून काही वेळातच त्यांची अंत्ययात्रा सुरु होणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

प्रसाद बेंद्रे यांच्या मागे पत्नी, आई व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. चार वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. प्रसाद यांचा दौंड येथील सायली डहाळे यांच्याशी जुलै २०१६ मध्ये विवाह झाला होता.

बेंद्रे कुटुंबीय शिवाजीनगर गावठाणात पंचमुखी मारुती परिसरात वास्तव्यास आहेत. शनिवारी प्रसाद यांचे निधन झाल्याची माहिती नातेवाइकांना समजली. त्यानंतर परिसरातील नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या घरी धाव घेतली. पोलीस वसाहतीतील हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालयामध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर मॉडर्न हायस्कुलमध्ये पुढील शिक्षण झाले. बारावीनंतर ते बीएसएफच्या १८२ व्या तुकडीत दाखल झाले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ते श्रीनगरमध्ये कार्यरत होते. नुकतीच त्यांची मणिपूर, इम्फाळ येथील चीन सीमेवर बदली झाली.  गणपतीत ते पुण्यात आले होते. हीच त्यांची अखेरची भेट ठरली. गणपतीनंतर त्यांची मणिपूरला बदली झाली. सुमारे ५ दिवसांपूर्वी त्यांना न्युमोनिया झाला होता. भाऊबिजेनिमित्त त्यांच्याशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे शुक्रवारी बोलणे झाले होते. त्यावेळी त्यांनी आता श्वसनाचा थोडा त्रास होत आहे. हॉस्पिटलमधून लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांना ह्दयविकाराचे एका पाठोपाठ दोन झटके आले. त्यातच त्यांचे निधन झाले.

आज सकाळी त्यांचे पार्थिव शिवाजीनगर गावठाणातील घरी आणल्यानंतर त्यांच्यावर धार्मिक विधी करण्यात आले. त्यानंतर एका सजविलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. परिसरात प्रसाद बेंद्रे यांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात आले आहेत.