एस कॉर्नर ठरलाय ‘मृत्युचा सापळा’ ! खंबाटकी घाटात बोअरवेल ट्रकचा अपघात, दोघांचा मृत्यु तर 3 जण जखमी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन  – पुणे – कोल्हापूर महामार्गावरील मृत्युचा सापळा म्हटल्या जाणार्‍या एस कॉर्नरवर शुक्रवारी सकाळी बोअरवेलच्या ट्रक उलटून झालेल्या अपघातात दोघा जणांचा मृत्यु झाला आहे तर, तीन जण जखमी झाले आहेत. खंबाटकी घाटातील एस कॉर्नरजवळ आज सकाळी सात वाजता हा अपघात झाला.

अपघातात मृत्यु पावलेले व जखमी हे तामिळनाडु राज्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. खबांटकी घाटातील एस कॉर्नर हा पुणे कोल्हापूर महामार्गावरील एक मृत्युचा सापळा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी गेल्या १० वर्षात झालेल्या अपघातात ८० हून अधिक जणांचा मृत्यु झाला असून ३०० जण जखमी झाले आहेत. हे वळण दूर करुन रस्ता सरळ करण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. मात्र, त्यानंतर कोणतेही काम झाले नाही.

आज पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा बोअरवेलचा ट्रक या एस कॉर्नरला उलटला. त्यात ट्रकच्या खाली सापडल्याने दोघांचा मृत्यु झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी जखमींना सातारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. ट्रक बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे.