राहुल गांधी पंतप्रधान झाल्यानंतर उधारी, व्यवसायिकाची अनोखी शक्कल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – दुकानामध्ये किंवा एखाद्या लहान चहाच्या टपरीमध्ये हमखास एक पाटी आपल्या नजरेस पडते. ती म्हणजे ‘आज रोख उद्या उधार’. याप्रमाणे काही व्यवसायिक उधारी बंद करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत असतात. अशीच एका सलूनचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने अनोखी शक्कल लढवली आहे.

‘जो पर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत, तो पर्यंत उधारी बंद’ अशी पाटी या सलून व्यवसायिकाने आपल्या दुकानात लावली आहे. ही शक्कल लढवली आहे माढा शहरातील एका सलून व्यावसायिकाने. सध्या ही पाटी शहरात जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. माढा शहरातील सचिन जेन्टस् पार्लरमध्ये गेलात तर तुम्हाला ही अनोखी पाटी वाचायला मिळेल.

या दुकानात लावलेली पाटीमुळे लोक कुतुहलापोटी या दुकानात गर्दी करत आहेत. या गर्दीमुळे दुकान मालकाचा व्यवसायही होत आहे आणि त्याला प्रसिद्धी देखील मिळत आहे. या पाटीचा फायदा असाही झाला, या दुकानात दाढी केल्यानंतर आणि केस कापल्यानंतर ग्राहक रोख पैसे देऊ लागल्याने दुकानदाराच्या उधारीचे प्रमाण कमी झाले आहे.

या दुकानाचे मालक सचिन पाटील सांगतात, मी राहुल गांधी यांचा चाहता असून ही पाटी लावण्यामागे त्यांची चेष्टा किंवा अवमान करण्याचा माझा उद्देश नाही. फक्त दुकानात होणारी उधारी कमी करण्यासाठी आणि व्यवसाय व्यवस्थित चालावा यासाठी ही पाटी लावली आहे.