उल्हास नदीत बुडून दोघांचा मृत्यू

 नेरळ : पोलीसनामा ऑनलाईन – उल्हास नदीवर आंघोळ करण्यासाठी आणि पोहण्यासाठी गेलेल्या पाषाणे जवळ दोघांचा बुडून मृत्यू झाला. दोघे तरुण असून धुळवड साजरी करून आंघोळीसाठी उल्हासनदीवर पोहचले होते. बुडालेल्या तरुणांमध्ये एक मुंबई घाटकोपर येथील आहे. दिवसभर धुळवडीनिमित्त विविध रंगांचा आनंद घेतल्यानंतर बहुतेक धुळवड प्रेमी नदीवर जाऊन आंघोळी करतात.

पाषाणे या रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या गावात ध्रुव रेसिडेन्सी असून त्या ठिकाणी राहणारे शामनाथ सिंग यांच्याकडे त्यांचे नातेवाईक मुंबई घाटकोपर येथून आले होते. कुटुंबातील सर्वांनी होळी खेळल्यानंतर आंघोळीसाठी तेथून जवळच असलेल्या उल्हास नदीवर पोहचले. दुपारी दीडच्या सुमारास विनय शामनाथ सिंग आणि देवेंद्र बिध्यय सिंग हे नदीमध्ये पोहता पोहता खोल पाण्यात गेले आणि बराच वेळ बाहेर येत नसल्याने त्यांचा शोध सुरू झाला.

स्थानिक लोकांनी शोध घेऊन त्या दोघांचा ठावठिकाणा लागत नसल्याने शेवटी नेरळ पोलिसांना कळविण्यात आले. नेरळ पोलिसांनी याबाबत जिल्हा पोलिसांना कळविल्यानंतर खोपोली येथून आपद्गग्रस्त मदतीसाठी या ग्रुपचे पोहणारे यांना पाचारण करण्यात आले आहे. मात्र, रात्रीपर्यंत त्यांचा मृतदेहाचा शोध लागला नव्हता.