जाहिरातींच्या होर्डिंगमुळे दोघांचे गेले जीव ,तरी कारवाई नाही

पिंपरी-चिंचवड पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली.या वाऱ्यामध्ये कोठेही झाड पडून किंवा इतर नैसर्गिक कारणामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या पावसात जाहिरातीचे मोठे होर्डिंग अंगावर कोसळल्याने दोन जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. याप्रकरणी आणखी कुणावरही कारवाई झालेली नसून चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शुक्रवारी दुपारी पुनावळे येथे वाऱ्यामुळे होर्डिंग अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत कांताबाई विश्वनाथ भारती (वय ५५, रा. चिखली) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मोशी येथे झालेल्या दुर्घटनेत प्रफुल्ल रमेशलाल शहा (वय ५१, रा. मोशी गावठाण) या चहा विक्रेत्याला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणांची आकस्मात मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कांताबाई शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पुनावळे येथील चौकातून जात असताना अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. चौकात बेंचमार्क रिअ‍ॅलिटी हे जाहिरातीचे होर्डिंग लावलेले होते. त्या होर्डिंग खालून कांताबाई जात असताना फलक अचानक कोसळला. यामध्ये कांताबाई गंभीर जखमी झाल्या. नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

देहूरोड-मोशी येथे बीआरटी रस्त्यावर भारतमाता चौकाजवळ प्रफुल्ल शहा यांचा चहाचा स्टॉल आहे. बाजूलाच लावलेला जाहिरात फलक वादळी वाऱ्याने खाली कोसळला, चहाच्या स्टॉलजवळ थांबलेले शहा यांच्या अंगावर कोसळल्यामुळे ते यात गंभीर जखमी आणि त्यांचा यात दुर्दैवी मृत्यु झाला. याप्रकरणी पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती दिली. शहरातील अनधिकृत आणि धोक्याच्या ठिकाणावरचे होर्डिंग पालिकेकडून आतातरी हटवले जाणार आहेत का ? तसेच त्यांच्यावर कारवाई केली जाणार का? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.

शिवसेनेचे पदाधिकारी योगेश बाबर ,सुलभा उबाळे यांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेऊन झालेल्या घटनेबद्दल निवेदन दिले. या घटनेत निष्पाप व्यक्तींच्या मृत्यूस पिंपरी -चिंचवड महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यांनी केली. यावेळी भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, समन्वयक युवराज कोकाटे, सचिन सानप, रोमी संधू, नगरसेविका रेखा दर्शिले, विभागप्रमुख विक्रम वाघमारे, आबा लांडगे, सुरज लांडगे, यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते.