पुण्यातील ‘त्या’ आरोपींना २४ जून रोजी फाशी देणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बीपीओ कर्मचाऱ्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याप्रकरणी दोघा दोषींना २४ जून रोजी फाशी देण्यात येणार आहे. पुरुषोत्तम बोराटे (३६) आणि प्रदीप कोकडे (३१) अशी आरोपींची नावे असून सध्या हे दोघे पुण्यातील येरवडा कारागृहात आहेत. पुणे जिल्हा आणि सत्र प्रधान न्यायाधीशांनी १० एप्रिल रोजी यासंबंधीचे वॉरण्ट जारी केले आहे.

पुण्यात २००७ मध्ये एका बीपीओ कर्मचाऱ्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणातील दोघा दोषींना २४ जून रोजी फाशी देण्यात येणार आहे. राष्ट्रपतींनी दोन वर्षांपूर्वी या दोघांचा दयेचा अर्ज फेटाळला होता. मुंबईतील बॉम्बस्फोटप्रकरणी ३० जुलै २०१५ रोजी याकूब मेमन याला फाशी देण्यात आले होते. त्यानंतर राज्यात या दोघांना फाशी देण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण –

पीडित महिला मूळची गोरखपूरची होती. नोकरीच्या अखेरच्या दिवशी बोराडे आणि कोकडे यांनी तिला तिच्या घरातून कार्यालयात नेण्यासाठी कंपनीच्या गाडीत बसविले व तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला. तिच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. तिचा मृतदेह पोलिसांना २ नोव्हेंबर २००७ रोजी गहुंजे येथे आढळला होता. या प्रकरणी बोराडे आणि कोकडे यांना अटक करण्यात आली होती.

मार्च २०१२ मध्ये पुणे सत्र न्यायालयाने दोघांना दोषी ठरविले आणि फाशीची शिक्षा ठोठावली. मुंबई उच्च न्यायालयाने आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दोषींचा दयेचा अर्ज फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयाने ८ मे २०१५ रोजी या दोघांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले होते. त्याप्रकरणातील दोघा दोषींना २४ जून रोजी फाशी देण्यात येणार आहे. पुणे जिल्हा आणि सत्र प्रधान न्यायाधीशांनी १० एप्रिल रोजी यासंबंधीचे वॉरण्ट जारी केले. येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य अधिकाऱ्याला फाशीची अंमलबजावणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.