मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील 2 अधिकारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पणजी : वृत्तसंस्था – गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत: ला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे. मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आज (शनिवार) त्यांच्या कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात विशेष सेवा अधिकारी (ओएसडी) उपेंद्र जोशी आणि खासगी सचिव सचिन गौरीश कळंगुटकर हे दोन अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. मुख्यमंत्र्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर उपेंद्र जोशी यांनी टेस्ट केली होती.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. ते आल्तिनो येथील सरकारी बंगल्यावर असून तेथूनच ते काम करत आहेत. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोविड चाचणी करुन घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यानुसार जोशी तसेच खासगी सचिव कळंगुटकर यांनी कोविड चाचणी करुन घेतली. शनिवारी त्यांच्या चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आपण कोविड पॉझिटिव्ह झाल्याचे जोशी यांनी स्वत: सोशल मीडियावरुन लगेच जाहीर केले आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तातडीने कोविड चाचणी करुन घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

राज्यात सध्या पाच हजाराच्या आसपास सक्रिय कोविड रुग्ण आहेत. एकूण 20 हजार जणांना मागील सहा महिन्यात कोविडची बाधा झाली असून पंधरा हजार लोक बरे झाले आहेत. सध्या काही सरकारी व खासगी इस्पितळातील खाटा कोविड रुग्णांनी भरल्या आहेत. प्लाज्मा दानासाठी लोकांनी पुढे यावे असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहेत. आरोग्य खात्याचे संचालक डिसा हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यातील 40 पैकी 6 आमदार कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर दोन माजी मंत्र्यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी एका माजी मंत्र्याचा मृत्यू झाला आहे.