‘टायगर’ पतौडी यांना एका डोळ्यानं दिसायचं कमी, वयाच्या 21 व्या वर्षी बनले ‘कर्णधार’ आणि बदलला टेस्ट इतिहास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खेळाडू अगदी त्यांच्या मनापासून खेळ खेळत असतात आणि त्यामध्ये त्यांचे कौशल्य देखील साथीला असते. त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे माजी भारतीय कर्णधार मन्सूर अली खान पतौडी. क्रिकेटच्या खेळात बारीक नजर ठेऊन खेळणे फार महत्वाचे असते, परंतु मन्सूर अलींना एका डोळ्याने कमी दिसत असूनही त्यांनी जगभर आपली प्रतिभा सिद्ध केली. ते पहिले भारतीय कर्णधार होते ज्यांनी संघाला परदेशी भूमीवर टेस्ट विजय मिळवून दिला.

मन्सूर अली खान पतौडी यांना अगदी लहान वयातच यश आणि कीर्ती प्राप्त झाली. 5 जानेवारी 1941 रोजी भोपाळच्या नवाब कुटुंबात जन्मलेल्या मन्सूर अली खान पतौडी यांना क्रिकेट विश्वात टायगर पतौडी आणि नवाब पतौडी म्हणूनही ओळखले जाते. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या मन्सूर अली खान पतौडी यांना वयाच्या 21 व्या वर्षी भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले होते.

सर्वात तरुण कर्णधार असल्याचा बहुमान
1961 ते 1975 या कालावधीत भारतीय संघासाठी क्रिकेट खेळणार्‍या मन्सूर अली खान पतौडी यांना सर्वात युवा कसोटी कर्णधार म्हणून मान मिळाला होता. मन्सूर अली खान पतौडीची ही नोंद जवळपास 52 वर्षांपर्यंत राहिली, परंतु 2004 मध्ये ततेंदा तैबूने हा विक्रम मोडला. आजही मन्सूर अली खान पतौडी हे भारतातील सर्वात युवा कसोटी कर्णधार आहेत. त्यांच्या पश्चात सचिन यांचे नाव येते, ज्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी कप्तानी केली होती.

मन्सूर अली खान पतौडीने भारतासाठी एकूण 46 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये 34.91 च्या सरासरीने 2783 धावा त्यांनी केल्या. मन्सूर अली खान पतौडीने आपल्या कसोटी कारकीर्दीत 6 शतके आणि 16 अर्धशतके झळकावली होती. कसोटी क्रिकेटमधील त्यांची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 203 इतकी आहे. मन्सूर अली खान पतौडी यांनी 300 हून अधिक प्रथम श्रेणी सामने देखील खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नवाब पतौडीने 15 हजाराहून अधिक धावा केल्या होत्या.

2011 मध्ये पतौडी यांचे निधन झाले
मन्सूर अली खान पतौडी अजूनही भारतीय संघाच्या सर्वोत्तम कसोटी कर्णधारांमध्ये गणले जातात. 22 सप्टेंबर 2011 रोजी फुफ्फुसाच्या संसर्गामुळे मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन झाले. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की मन्सूर अली खान पतौडी यांना दोन-दोन चेंडू दिसायचे. खरं तर, वडील इफ्तीकर अली खान पतौडी यांच्या निधनानंतर वयाच्या 11 व्या वर्षी टायगर पतौडी इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेले होते, जेथे त्यांचा एक अपघात झाला होता.

शिक्षण चालू असतानाच मन्सूर अली खान पतौडी यांनी इंग्लंडमध्ये देशांतर्गत सामने खेळण्यास सुरुवात केली होती. त्याच वेळी, इंग्लंडमध्ये एका कार अपघाताने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले, कारण या अपघातात कारचा काच त्यांच्या उजव्या डोळ्यात शिरला आणि त्यांना दिसणे बंद झाले. मात्र, त्यांनी धैर्य सोडले नाही, जो त्यांचा सर्वात मोठा विजय होता. एका डोळ्याने दिसत नसल्यामुळे मन्सूर अली खान पतौडी यांना डॉक्टरांनी क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता पण पतौडी यांनी ऐकले नाही.

अपघाताच्या 5 महिन्यांनंतर केले कसोटीत पदार्पण
मन्सूर अली खान पतौडी अपघाताच्या काही महिन्यांनंतर भारतात आले आणि त्यांनी आपल्या ठाम हेतूंनी अपघाताच्या पाच महिन्यांनंतर भारतासाठी कसोटी सामन्यात प्रवेश केला. हा सामना इंग्लंडविरुद्ध 1961 मध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर खेळला गेला होता. आश्चर्यकारक बाब अशी आहे की फलंदाजी करताना मन्सूर अली खान पतौडी यांना दोन चेंडू दिसायचे, ज्यामुळे ते अस्वस्थ असायचे, परंतु तो प्रश्नही त्यांनी मार्गी लावला आणि देशासाठी खेळत राहिले.

मन्सूर अली खान पतौडी यांनी बऱ्याच सरावानंतर निर्णय घेतला होता की ते अशा चेंडूवर शॉट खेळतील जो आतील बाजूस नजरेस पडेल. ही युक्ती नवाब पतौडींच्या कामी आली. याशिवाय, बर्‍याचदा ते त्यांच्या टोपीने आपला उजवा डोळा लपवत असत जेणेकरून त्यांना फक्त एक चेंडू दिसू शकेल आणि यामुळे त्यांना शॉट खेळणे सोयीस्कर होईल. करिअरमध्ये 46 कसोटी सामने खेळणार्‍या मन्सूर अली खान पतौडी यांनी 40 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी भारताने 9 सामने जिंकले.