देवीचे विसर्जन करताना तलावात बुडून मुलाचा मृत्यू

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – देवीचे विसर्जन करताना औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग मंदिराच्या पूर्व दिशेला असलेल्या हरिहर तलावात पाय घसरून देवजी साहेबराव खंडागळे (१५) या मुलाचा मृत्यू झाला. दिवसभर या तलावात दुर्गा देवीचे विसर्जन सुरू होते. शेवटच्या देवीची विसर्जन मिरवणूक तलावाजवळच्या बाजार मैदानापर्यंत आली असताना तलावात मुलगा पडून तो बुडाला.

तलावात मुलगा बुडाल्याची माहिती बंदोबस्तातील पोलिसांना समजली असता पोलीस कर्मचारी इम्रान पठाण, पिराजी पाचपुते, अरविंद राठोड यांनी तलावाकडे धाव घेतली. यावेळी बाळू लडके, अतुल देशमुख, गजानन काळे यांनी तलावात उडी घेतली. १५ ते २० मिनिटांनी युवक बेशुद्धावस्थेत सापडला.

पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे, फौजदार राहुल तायडे यांनी त्या युवकास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉ. राहुल वाघमारे यांनी तपासून युवकास मृत घोषित केले. घटनास्थळी व रुग्णालयात बघ्यांची एकच गर्दी जमली होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद झाली नव्हती. घटनेने शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

पुण्यात दुर्दैवी घटना ; लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षाच्या नशराचा मृत्यू