बाबांना केलेला ‘तो’ बाय ठरला चिमुरड्याच्या आयुष्यातला शेवटचा ‘बाय’…   

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिकच्या ‘शिरीन हाईट्स’ च्या एका बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून साडेतीन  वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. अंशुमन शर्मा असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. अंशुमन आपल्या वडिलांना टाटा-बाय बाय करण्यासाठी बाल्कनीत गेला होता तेव्हा त्याचा तोल  जाऊन तो खाली पडला आणि त्याक्षणी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्याख्या केली जात आहे.
अजय शर्मा यांनी दोन महिन्यांपूर्वीच अंबडच्या शिरीन हाईट्समधील नव्या फ्लॅटमध्ये राहायला सुरुवात केली होती. मात्र त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीला बसवण्यात आलेला लोखंडी कठडा कमी उंचीचा होता आणि हेच अंशुमनच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं. अंशुमनचे वडील अजय शर्मा कामानिमित्त घराबाहेर पडले. साडेतीन वर्षांचा अंशुमन आपल्या वडिलांना निरोप देण्यासाठी गॅलरीत आला. टाटा-बाय बाय करुन तो गॅलरीतच खेळत बसला. दुसरीकडे त्याची आई टीव्ही बघण्यात दंग होती. तेवढ्यात गॅलरीत खेळता खेळता अचानक अंशुमनचा तोल गेला आणि तो तिसऱ्या मजल्यावरुन खालीगेटवर पडला. डोक्याला लागल्यामुळे अंशुमनचा मृत्यू झाला.
घराच्या बाल्कनीतून पडून चिमुरड्याचा मृत्यू होण्याची नाशिकमधील तिसरी घटना आहे. त्यामुळे पालकांना आपल्या पोरांवर डोळ्यांत तेल घालून लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित होत आहे.