पतंग उडवताना विजेच्या मीटरला लागला हात, तरुण गंभीर जखमी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- मकरसंक्रांतीच्या निमित्ताने देशभर पतंगोत्सव साजरा करण्यात येत आहे. पण पंतग उडवतांना अनेकदा अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. आता मुंबई येथे पतंगबाजी करीत असतांना विजेच्या मीटरला हात लागून एक २२ वर्षीय तरुण गंभीररीत्या जळाल्याची माहिती मिळते आहे. त्याला उपचाराकरिता मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो ८० टक्के भाजला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

याबाबतीत  बोलताना सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितलं की, ‘‘या मुलाला शॉक लागल्यानं तो ८० टक्के भाजला. रुग्णालयात आणलं तेव्हा त्याची प्रकृती खूपच चिंताजनक होती. त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाल्याचं दिसलं. शॉक लागल्यानं दूर फेकल्यानं त्याच्या डोक्याला मार लागलेला असावा. सध्या या तरुणावर अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती खूपच नाजूक आहे.’’

मकरसंक्रात आणि पतंग हे समीकरणच झालं आहे. मात्र पतंगबाजी अनेकांच्या जीवावर बेतते. मागील वर्षी पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजाने गळा कापल्याने पुण्यातील २६ वर्षीय डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला होता.पतंग उडवताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे डॉक्टर म्हणाले.

पतंगामुळे जयपूरमध्ये ३०० जखमी..

मकरसंक्रांतीचा सण आला की, अवघे आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून जाते. जिथेतिथे पतंगोत्सव सुरु करण्यात यतो मात्र या पतंगामुळे जयपुरात ३०० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. या शहरातील जवळपास सर्वच रुग्णालयांमध्ये कालपासून जखमींच्या रांगा लागल्या आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पतंग आणि पतंगाचा मांजा या दोन्हीमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. सुदैवाने येथे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जखमींचे प्रमाण मात्र लक्षणीय आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयात आतापर्यंत २२७ रुगणांवर १५ जानेवारी रोजी  उपचार करण्यात आले आहेत. शहरातील ४५ रुग्ण पतंगांमुळे गंभीर जखमी झाले आहेत तर, ४१ रुग्ण मांजामुळे गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णांच्या जखमा शिवणे,मलमपट्टी करणे, एक्स-रे काढणे अशा कामांमध्येच रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांचा वेळ जात असल्यानं आरोग्यसेवेवर देखील ताण आला आहे.

जयपुरात घडलेले काही अपघात..  

— कटलेली पतंग पकडण्याच्या नादात एक चार वर्षाचा मुलगा गच्चीवरून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे.

— पतंग पकडण्याच्या नादात मासूम आलम नावाचा एक तरुण दुचाकीखाली आल्यानं त्याला पाय गमवावे लागले आहेत.
— मांजा गळ्यात अडकल्याने, पतंग चेहऱ्यासमोर आल्याने देखील मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.
— पतंगामुळं होणारे अपघात थांबवण्यासाठी सरकार ताबडतोब पावलं उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नॉयलॉन मांजा नकोच..

सध्या सुती धाग्यापेक्षा नायलॉन मांजाला अनेकांची पसंती असल्याचे पतंग विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मात्र स्वतःच्या क्षणिक आनंदासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणं प्रत्येकाने टाळायला हवं.पूर्वी पतंग उडवण्यासाठी साध्या सुती दोऱ्याचा वापर केला जात होता. मात्र हा दोरा तुटत असल्याने आणि स्पर्धेत विरोधकांचा पतंग कापण्यासाठी आणि आपला पतंग सुरक्षित राहण्यासाठी चीनी, नायलॉनच्या मांजाचा वापर वाढला. नायलॉनच्या दोऱ्यावर डिंकाचा वापर करून काचेचा चुरा लावण्यात येतो. हा दोरा सहजासहजी तुटत नाही. हा दोरा दुचाकीस्वाराच्या गळ्याभोवती अडकल्यास गळा चिरण्याचा धोका असतो. तसेच एकादा यात पक्षी अकडल्यास त्याची सुटका सहजासहजी होत नाही. हा मांजा चिनी असून त्याच्यावर बंदी असूनही बाजारात सहज मिळत असल्याने त्याचा वापर वाढला आहे. नॉयलॉन मांजाच्या विक्रीवर निर्बंध आणण्यात आले असले तरी काही जणांकडून अजूनही त्याची सर्रास विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे.